राफेल नदालची पूरग्रस्तांना मदत; फेडरर आणि जोकोविचनेही केले कौतुक

लाल मातीचा बादशहा असलेल्या टेनिसपटू राफेल नदालने मॅजोर्का येथे आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी स्वच्छता करण्यास मदत केली. त्याने केलेल्या या मदतीचे रॉजर फेडरर, अलेक्झांडर झेवरेव्ह आणि नोवाक जोकोविचने कौतुक केले आहे.

मॅजोर्का येथे राहणाऱ्या नदालने बूट आणि पांढरे ग्लोव्ह्ज घालत एका गोदामातील पाणी सरकवत स्वच्छतेत सहभाग घेतला. त्याचे या पोशाखातील फोटोज सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

“मॅजोर्कासाठी हा दिवस खुप दु:खाचा आहे. या घटनेत मृत्युमुखी आणि जखमी झालेल्या नातेवाईकांसाठी माझी सहानुभुती आहे”, असे ट्विट करत नदालने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे.

17 ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या नदालने या पुरात जे बेघर झाले आहेत त्यांच्यासाठी राहण्यास स्वत:चे स्पोर्ट्स सेंटर आणि टेनिस अकादमी खुली करून दिली आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यु झाला आहे.

सोमवारी (8 ऑक्टोबर) आलेल्या एटीपी क्रमवारीत नदालच अव्वल आहे. तर फेडरर आणि जोकोविच अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच त्याने सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या किंग सलमान टेनिस कपमध्ये जोकोविच विरुद्ध प्रदर्शनीय सामना खेळण्यास होकार दिला आहे.

या सामन्याचे ट्विटही नदालने केले होते. नदाल आणि जोकोविच हे दोघे 52 वेळा आमने-सामने आले असून सर्बियन स्टार जोकोविच 27 सामने जिंकत आघाडीवर आहे.

तसेच नदालने गुडघा दुखापतीने युएस ओपनमधून माघार घेतली होती. यातून सावरत तो आता 29 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रोलेक्स पॅरीस मास्टर्समध्ये खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच शार्दुल ठाकुरला बसला मोठा धक्का

वेगाचा बादशहा उसेन बोल्टची फुटबॉलमध्येही चमकदार कामगिरी

आर अश्विनने केला मोठा पराक्रम; अनिल कुंबळेलाही टाकले मागे