एटीपी फायनल्स: रॉजर फेडरर विरुद्ध अलेक्झांडर झवेरेव आज सामना

लंडन । एटीपी फायनल्सच्या तिसऱ्या दिवशी रॉजर फेडरर विरुद्ध अलेक्झांडर झवेरेव या दोन खेळाडूंमध्ये सामना होणार आहे. साखळी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दोघांनीही आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले आहे.

अलेक्झांडर झवेरेवची ही पहिलीच एटीपी फायनल्स असून फेडररने येथे १५वर्षांपूर्वी पदार्पण केले आहे. कारकिर्दीतील पहिलाच एटीपी फायनल्स स्पर्धेतील सामना झवेरेव क्रोशियाच्या मारिन चिलीचबरोबर जिंकला तर फेडररने अमेरिकेच्या जॅक सोकला पराभवाची धूळ चारली.

३६ वर्षीय फेडरर या स्पर्धेचा ६वेळा विजेता आहे. जर्मनीच्या या तरुण खेळाडूला जर फेडररला पराभूत करायचे असेल तर मोठी मेहनत करावी लागणार आहे. यावर्षी त्याने जोकोविच आणि फेडरर या दिग्गजांना एटीपी मास्टर्स स्पर्धांत पराभूत केले आहे.

२००७ पासून जागतिक क्रमवारीत पहिल्या ३ खेळाडूंमध्ये येणारा अलेक्झांडर झवेरेव हा सर्वात तरुण खेळाडू आहे.

रॉजर फेडररनेही यावर्षी एटीपी वर्ल्ड स्पर्धेत एकूण ७ विजेतेपद मिळवली असून जागतिक क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंविरुद्ध १२ पैकी ११ लढती तो जिंकला आहे. तो जी एक लढत टॉप१० विरुद्ध हरला आहे तो खेळाडू होता अलेक्झांडर झवेरेव आणि स्पर्धा होती रॉजर्स कप.

नदालने आज या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे फेडररचे ७व्या एटीपी फायनल्स विजेतेपदाचा दावा आणखी मजबूत झाला आहे.