“दक्षिण आफ्रिका भारतात किती वेळा झालाय विजयी?” विराटचा प्रतिप्रश्न

सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १३५ धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर विराट कोहली पत्रकार परिषदेत भडकला होता.

त्याला एका भारतीय पत्रकाराने “भारताचा उत्तम ११ जणांचा संघ काय?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर विराटने उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेच्या पत्रकाराला प्रश्न विचारला, “दक्षिण आफ्रिका भारतामध्ये खेळताना किती वेळा विजयाच्या जवळ आला आहे?”

न्यूलँड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाचा ७२ धावांनी पराभव झाला होता. या सामन्याचा संदर्भ देत विराट म्हणाला “आम्ही न्यूलँड्सच्या खेळपट्टीविषयी कसलीही तक्रार केली नाही. आम्हाला तो सामना जिंकण्याची संधी होती.”

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांकडून हाराकिरी बघायला मिळाली. पहिल्या डावात फक्त विराट कोहलीचे शतक सोडले तर बाकी फलंदाजांनी काही खास केले नाही. तसेच दुसऱ्या डावही भारतीय फलंदाजी कोलमडली. आज सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताचे ७ फलंदाज पहिल्याच सत्रात बाद झाले.

या पराभवामुळे भारतीय संघ ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ०-२ असा पिछाडीवर पडला आहे. त्यामुळे २४ जानेवारी पासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात व्हाईटवॉश टाळण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

याविषयी विराट म्हणाला या सामन्यासाठी आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करणार आहोत

भारतीय संघाने आज तीन वर्षानंतर पहिल्यांदा कसोटी मालिका गमावली आहे. तर विराटच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच मालिकेत पराभव स्वीकारला आहे.