संपूर्ण भारत फुटबॉलमय: ‘फुटबॉल टेक्स ओव्हर’ हे ब्रिदवाक्य ठरलं खरं !

काल एका उत्सवाचा शेवट झाला आणि तो सुद्धा जशी सर्वांची इच्छा असते अगदी तसा म्हणजेच गोड. प्रथमच फीफाच्या स्पर्धेचे आयोजन करायची संधी मिळालेल्या भारतासाठी तर तो एक उत्सवच होता.

तो साजरा पण तसाच झाला, दिवाळीच्या वेळेत आलेली ही स्पर्धा २२ दिवसांची दिवाळी घेऊन आली. याचा शेवट केला इंग्लंडने स्पेनवर ५-२ असा विजय मिळवत. त्यांनी आपला १७ वर्षाखालील पहिला फुटबॉल वर्ल्डकप जिंकला. ब्राझीलने मालीला २-० असे पराभूत करत तिसरे स्थान पटकावले.

स्पेनची १७ वर्षाखालील वर्ल्डकप फायनलला पोहचायची ही चौथी वेळ होती पण त्यांना एकदा सुद्धा कप जिंकता आला नाही. २-० असे आघाडीवर असलेल्या स्पेनने पहिल्या हाफच्या शेवटच्या २ मिनिटात १ आणि दुसऱ्या हाफमध्ये ४ गोल खाल्ले. स्पेनने ७ सामन्यात १६ तर इंग्लंडने सर्वाधिक ७ सामन्यात २३ गोल केले. तर संपूर्ण वर्ल्डकप मध्ये एकूण १८३ गोल झाले.

‘गोल्डन बाॅल’ इंग्लंड आणि मॅन्चेस्टर सिटीच्या फिलिप फोडेनला, ‘गोल्डन बूट’ इंग्लंडच्या रियान ब्रुस्टरला तर ‘गोल्डन ग्लोव्ह’ ब्राझीलच्या ब्राजाओला यांना मिळला. फेयर प्लेचा पुरस्कार ब्राझीलच्या संघाला देण्यात आला.

इंग्लंडसाठी हे वर्ष खूपच लाभदायी ठरले आहे. त्यांच्या २० वर्षाखालील संघानेसुद्धा यावर्षी वर्ल्डकपवर आपले नाव कोरले तर १९ वर्षाखालील संघाने युएफा लीग आपल्या नावे केली.

प्रथमच आयोजन करताना भारताने सर्व सामन्यांना भरभरुन उपस्थिती दाखवत फीफाच्या सर्व युथ स्पर्धेच्या उपस्थितीचे विक्रम मोडले. ५२ सामन्यात १३,४७,१३३ प्रेक्षकांनी हजेरी लावत चायनाचा १९८५ सालचा (१७ वर्षाखालील वर्ल्डकप) १२,३०,९७६ चा तसेच कोलंबियाचा २०११ सालचा (२० वर्षाखालील वर्ल्डकप) १३,०९,९२९ चा विक्रम मोडीत काढला.

हा पाठिंबा पाहूनच फीफाचे अध्यक्ष जीआनी इन्फाटींनो यांनी २० वर्षाखालील वर्ल्डकपच्या आयोजनासाठी भारताचा विचार करायचे आश्वासन दिले.

एकाच देशाला लागोपाठ वर्ल्डकपचे आयोजन करता येत नाही तरी सुद्धा भारताचा विचार करणार यातच खूप मोठा विजय आहे असे म्हणायला हरकत नाही.

नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)