कोण आणि कसे ठरवतात फुटबाॅल विश्वचषकाचे आयोजक देश?

-नचिकेत धारणकर (Twitter- @nachi_1793 )

दर चार वर्षांनी जगात जवळजवळ सगळ्या देशांतून विश्वचषक पाहिला जातो. अगदी रात्री बेरात्री जागून फुटबॉलवेडे आपल्या संघाचा सामना बघतात. विश्वचषक संपता संपता काही जण आपला संघ जिंकला म्हणून आंनदी तर काही जण आपला संघ हरला म्हणून दुःखी होतात. मग वेध लागतात पुढच्या विश्वचषकाचे. तो कुठे होणार? मग कोणत्या सामन्याला आपण जाऊ शकतो? तिकीट किती असेल असे नानाविध प्रश्न डोक्यात येऊ लागतात. मात्र हा पुढचा विश्वचषक कुठे होणार हे ठरतं तरी कसं? अमुक देशात विश्वचषक होणार हे कोण ठरवतं? त्यासाठी काय निकष असतात?

कसे ठरते कोण भुषवणार विश्वचषकाचे यजमान पद?
१९३० ते १९९८ दरम्यान यजमानपद युरोप, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका यांच्यातच विभागले होते. पण २००२ला विश्वचषकाचे आयोजन आशियामध्ये झाले. विश्वचषकाच्या यजमान पदासाठी लिलाव लागतो. फीफा (इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबाॅल) इच्छूक देशांसाठी एक पत्रक काढते. फीफा त्याचबरोबर लिलावाचे पत्रक, कागदपत्राची यादी, यजमान पदाचा करार पाठवते. असोसिएशनचे सभासद लिलावाचा करार तसेच लिलावाची मागणी पूर्ण झाल्याची मान्यता जमा करतात. त्याप्रमाणे सभासद लिलावाच्या योग्यतेप्रमाणे जमा करतात. गुप्त मतदानाद्वारे विश्वचषकाच्या आयोजकांच्या निवडीची प्रक्रिया होते. फीफा सगळ्या लिलावासाठी जमा झालेल्या अर्जांचे मुल्यमापण करून निवडलेले आयोजक मान्यतेसाठी पाठवते. त्यानंतर फीफा आयोजकांचे नाव जाहीर करते.

विश्वचषकाच्या यजमान पदासाठी काय आहेत आवश्यक गोष्टी?

२००२ साली दक्षिण कोरिया आणि जपान येथे झालेल्या विश्वचषकात २ देशांच्या २ वेगवेगळ्या आयोजनच्या समितीमुळे झालेला त्रास पाहता फीफाने २ देशांना मिळून आयोजनावर बंदी आणली होती ती परत मागे घेतली. फक्त आयोजन समिती एकच पाहिजे अशी अट घालण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार कोणताही संघ आयोजन करू शकतो फक्त त्यांच्या खंडाने मागील २ विश्वचषकाचे आयोजन केलेले नसावे.

मैदानाच्या क्षमतेबद्दल काही अटी:-
पहिल्या सामन्यासाठी क्षमता:- किमान ८०,०००
साखळी फेरीतील सामन्यांसाठी क्षमता :- किमान ४०,०००
उपात्यंपूर्व फेरीतील सामन्यांसाठी क्षमता :- किमान ४०,०००
उपांत्य फेरीतील सामन्यांसाठी क्षमता :- किमान ६०,०००
तिसर्या स्थानासाठीच्या सामन्यासाठी क्षमता :- किमान ४०,०००
अंतिम सामन्यासाठी क्षमता :- किमान ८०,०००.

२०१८ च्या विश्वचषकासाठी कधी आणि कशी झाली रशियाची निवड?
२० विश्वचषकस्पर्धेत १६ देशांनी विश्वचषकाच्या आयोजनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्या नंतर यंदा प्रथमच रशिया २१व्या विश्वचषकाचे आयोजन करणार आहे. जानेवारी २००९ साली इच्छूक देशांचे अर्ज मागितल्यानंतर मार्च महिन्यापर्यंत सर्वांनी अर्ज दाखल केले. १३ देशांचे मिळून एकूण ११ अर्ज आले ज्यात बेल्जियम-नेदरलॅंडने आणि पोर्तुगाल-स्पेनने एकत्र विश्वचषकाच्या नियोजनाचा अर्ज केला. तर मेक्सिकोने दाखल केलेला अर्ज २८ सप्टेंबर २००९ ला मागे घेतला आणि इंडोनेशियाला त्यांच्या शासनाने मदत न केल्याने त्यांचा अर्ज नाकारण्यात आला.

उरलेल्या ९ मधून ५ देशांनी (दक्षिण कोरिया, जपान, कतार, ऑस्ट्रेलिया, युनाएटेड स्टेट्स) फक्त २०२२च्या विश्वचषकासाठी तर उरलेले २०१८ आणि २०२२ च्या विश्वचषकासाठीचे अर्ज होते.

सप्टेंबर २०१० या महिन्यात सर्व प्रक्रिया फीफाने पुर्ण केली. आणि २ डिसेंबर २०१० ला फीफाच्या मुख्यालयात झुरीचला फीफाचे अध्यक्ष सेप ब्लाटरयांनी नवीन देशांना संधी देऊन फुटबाॅलला अजून प्रगत करण्याचा हेतूने २०१८ आणि २०२२ च्या विश्वचषकाचे आयोजक घोषित केले.

मतदानासाठी एका देशाला १२ मत पडणे आवश्यक असते. जर कोणत्याच देशाला १२ मत नाही पडले तर सर्वात कमी मत पडलेला देश स्पर्धेतून बाहेर जातो आणि पुन्हा मतदान होते.

२०१८ च्या विश्वचषकासाठीच्या मतदानात रशियाला ९ आणि १३ तर दूसर्या स्थानावर स्पेन-पोर्तुगालला ७ आणि ७ मत मिळाले. तर २०२२च्या विश्वचषकासाठीच्या मतदानात कतारला ११,१०,११,१४ मत मिळाले. ४थ्या फेरीत त्यांना १४ मत पडले.