फिफा विश्वचषक २०१८- ओळख ड गटाची

-नचिकेत धारणकर (Twitter- @nachi_1793 )

मागील विश्वचषकातील उपविजेते अर्जेन्टिना त्यांच्या कर्णधार मेस्सीच्या कदाचित शेवटच्या समजल्या जाणाऱ्या विश्वचषकात विजेतेपद मिळवून त्याच्या स्वप्नाला पूर्ण करायचा प्रयत्न करतील. गटात इतर संघांच्या तुलनेत सोप्पे विरोधी संघ मिळाल्याने पुढील फेरीतील त्यांचे स्थान जवळजवळ निश्चित समजले जात आहे. तर युरो २०१६ला इंग्लंड संघाला पराभवाचा धक्का देणारे आइसलँड सुद्धा याच गटात आहेत. क्रोएशियाला पराभवाचा धक्का देऊन ते सुद्धा पुढील फेरीत जाण्याचे प्रबळ दावेदार आहेत. तर मैत्रीपूर्ण सामन्यात अर्जेन्टिनाला नमवणाऱ्या नायजेरियाचा सुद्धा याच गटात समावेश आहे. त्यामुळे दुसऱ्या स्थानासाठी ड गटात चांगलीच चुरस निर्माण होऊ शकते.

गट ड
अर्जेन्टिना :- जागतिक क्रमवारी ५
फुटबॉल विश्वातील सर्वोत्तम खेळाडूंमधील एक लिओनल मेस्सीहीच अर्जेन्टिनाची सर्वात जमेची बाजू आहे. उपविजेता हा संघ या वर्षीच्या विश्वचषकासाठीसुद्धा मेस्सीच्याच बळावर पात्र ठरला आहे. पात्रता फेरीत मेस्सी संघात असताना ५ मधून ४ तर मेस्सी नसताना ७ मधून केवळ १ सामन्यात संघाला विजय मिळवता आला आहे. यावरूनच विश्वचषकात मेस्सीच्या प्रदर्शनावर सर्व अर्जेन्टिना संघाचे स्पर्धेतील भवितव्य असेल. पात्रता फेरीत शेवटच्या सामन्यात मेस्सीने हॅट्ट्रिक करत संघाला विश्वचषकाचे तिकीट मिळवून दिले होते. गोलकिपर रोमेरो आणि बचावफळीतील ओटमेंडी यांच्या दुखापतीमुळे त्यांना संघात निवड झाल्यानंतर बाहेर जावे लागले. त्यामुळे अर्जेन्टिना साठी हा चिंतेचा विषय आहे.

सामन्यांचे वेळापत्रक :- अर्जेन्टिना विरुद्ध
१६ जून आइसलँड
२१ जून क्रोएशिया
२६ जून नायजेरिया
विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी :- विजेते (१९७८, १९८६)
विश्वचषकातील प्रदर्शन :- ७७ सामने ४२ विजय २१ पराभव तर १४ सामने ड्रॉ.
अर्जेन्टिनाने विश्वचषकात एकूण १३१ गोल्स केले असून ८४ गोल्स त्यांच्या विरुद्ध झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी :-
ब्राझील (२०१४) :- उपविजेते.
आफ्रिका (२०१०) :- उपउपांत्य फेरीत प्रवेश.
जर्मनी (२००६) :- उपउपांत्य फेरीत प्रवेश.
दक्षिण कोरिया आणि जपान (२००२) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.

मॅनेजर :- जॉर्जे सॅमपोली
प्रमुख खेळाडू :- लिओनल मेस्सी
संभाव्य रचना :- २-३-३-२

आइसलँड :- जागतिक क्रमवारी २२
विश्वचषकात प्रथमच पात्र ठरलेल्या या संघाकडून सर्व फुटबॉल प्रेमींना खूप अपेक्षा आहेत. त्रिनिनाद आणि टोबेको या देशाचा विश्वचषकात खेळणारा सर्वात लहान देश हा विक्रम आइसलँडने मोडीत काढला. पनामा आणि आइसलँड हे सर्वात छोटे देश यावर्षी विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. आइसलँडने २०१६च्या युरो स्पर्धेत इंग्लंडला धक्का देत आपली दावेदारी तेव्हाच सिद्ध केली होती. अनुभवाची कमी असली तरीसुद्धा त्यांची जिद्द आणि सांघिक खेळाची सर्व स्थरावर प्रशंसा झाली होती. या विश्वचषकात त्यांचा मार्ग जरी खडतर असला तरी त्यांनी पुढील फेरीत प्रवेश मिळवला तरी कौतुकास्पद असेल.
सामन्यांचे वेळापत्रक :- आइसलँड विरुद्ध
१६ जून अर्जेन्टिना
२२ जून नायजेरिया
२६ जून क्रोएशिया
विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी :- विश्वचषकास पात्र (२०१८)
मॅनेजर :- हैमिर हॅलग्रिमसन
प्रमुख खेळाडू :- जिलफी सिगुर्डसून
संभाव्य रचना :- ४-२-३-१

क्रोएशिया :- जागतिक क्रमवारी १८
रिअल माद्रिद आणि बार्सिलोनाच्या मध्यफळीतील प्रमुख खेळाडू आणि जुवेंटसचा आक्रमक खेळाडू यांचे मिश्रण असलेला हा क्रोएशियाचा संघ गटातून दुसऱ्या स्थानावर पात्र ठरण्यासाठी उत्सुक असेल. अर्जेन्टिनाचे तगडे आव्हान पेलून त्यांना आइसलँड आणि नायजेरियाचा पराभव करने गरजेचे आहे. मॉड्रिक आणि राकाटिक वर मध्यफळीची तर मारिओ मांडझुकीचवर आक्रमणाची भिस्त असेल.
सामन्यांचे वेळापत्रक :- क्रोएशिया विरुद्ध
१६ जून नायजेरिया
२२ जून अर्जेन्टिना
२७ जून आइसलँड
विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी :- ३रे स्थान (१९९८)
विश्वचषकातील प्रदर्शन :- १६ सामने ७ विजय ७ पराभव तर २ सामने ड्रॉ.
क्रोएशियाने विश्वचषकात एकूण २१ गोल्स केले असून १७ गोल्स त्यांच्या विरुद्ध झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी :-
ब्राझील (२०१४) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
जर्मनी (२००६) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
दक्षिण कोरिया आणि जपान (२००२) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
फ्रान्स (१९९८) :- ३रे स्थान
मॅनेजर :- झाल्टको डॅलिस
प्रमुख खेळाडू :- लुका मॉड्रिक
संभाव्य रचना :- ४-२-३-१

नायजेरिया :- जागतिक क्रमवारी ४७
मजबूत मध्यमफळी आणि विंगरचा प्रतिहल्ला यावर नायजेरियाने मागील काही वर्षात मोठ्या मोठ्या संघांना विजयासाठी खूप मेहनत घ्यायला लावली आहे. मागील वर्षी केलेला अर्जेन्टिनाचा पराभव याचे उत्तम उदाहरण आहे. कर्णधार जॉन ओबी मायकेलचा अनुभव आणि व्हिक्टर मोजेसवर संघाची मदार असेल.
सामन्यांचे वेळापत्रक :- नायजेरिया विरुद्ध
१६ जून क्रोएशिया
२२ जून आइसलँड
२६ जून अर्जेन्टिना
विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी :- अंतिम १६ संघात प्रवेश (१९९४, १९९८, २०१४))
विश्वचषकातील प्रदर्शन :- १८ सामने ५ विजय १० पराभव तर ३ सामने ड्रॉ.
नायजेरियाने विश्वचषकात एकूण २० गोल्स केले असून २६ गोल्स त्यांच्या विरुद्ध झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी :-
ब्राझील (२०१४) :- अंतिम १६ संघात प्रवेश.
दक्षिण आफ्रिका (२०१०) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
दक्षिण कोरिया आणि जपान (२००२) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
फ्रान्स (१९९८) :- अंतिम १६ संघात प्रवेश.
मॅनेजर :- गेरनॉट रोहर
प्रमुख खेळाडू :- व्हिक्टर मोजेस
संभाव्य रचना :- ४-२-३-१

फिफा विश्वचषकाशी संबंधीत अन्य वृत्त-

-फिफा विश्वचषक २०१८- ओळख अ गटाची!

-फिफा विश्वचषक २०१८- ओळख ब गटाची!

-फिफा विश्वचषक २०१८- ओळख क गटाची!