जेव्हा महाराष्ट्राचे विधानभवन बनते फुटबॉलचे मैदान !

भारत आणि फुटबॉल यांच्यातील नात्याने नवीन रूप धारण केले आहे. भारतात होणाऱ्या फिफाच्या १७ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल विश्वचषकाला भारत एक उत्सव म्हणून साजरा करणार आहे. फुटबॉलची वाढती लोकप्रियता पाहता हा विश्वचषक खूप मोठा होईल यात शंका नाही. फुटबॉल खेळाच्या प्रेमापासून महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदार हे देखील वाचू शकले नाहीत. यांनी तर विधानभवनाच्या पार्किंगला फुटबॉल मैदान बनवून एक सामनाच खेळला.

या सामन्यासाठी दोन संघ होते. एक सभापती ११ आणि दुसरा अध्यक्ष ११. सामना सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर नाणेफेक झाली. युवक कल्याण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी ही नाणेफेक सभापती ११ने जिंकली असे घोषित केले. रामराजे निंबाळकर सभापती ११चे कर्णधार होते तर हरिभाऊ बोडगे हे अध्यक्ष ११चे कर्णधार होते. अध्य्क्ष ११संघ निळ्या जर्सीमध्ये होता तर सभापती ११ हा संघ पिवळ्या रंगाची जर्सी घालून खेळत होता.

प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात झाली आणि हे जसे विधानभवनात एखादे विधेयक पारित करायचे म्हणून गोंधळ उडवून देतात तसेच खेळायला सुरुवात झाली.पण येथे ‘गोल’ मात्र फिक्स होता. खेळातील सर्व नियम बाजूला सारून हा खेळ त्यांच्यात भलताच रंगला. विनोद तावडे काल भलत्याच विनोदी मूडमध्ये होते आणि या सामन्याचे सुंदर समालोचन करत होते. मध्येच खेळाडूंवर ‘कमी पळा ,उद्या पायानेच घरी जायचे’ असे विनोदी वक्तव्य करून प्रेक्षकात हशा उडवून देत होते.

खेळताना होणार गोंधळ पाहून खेळाडूंच्या संख्येवर तावडेंनी मर्यादा आणली आणि आता सामना ७ -७ खेळाडू घेऊन सुरु होणार होता. पण निवडणुकीला उभे राहायची सवय असणारे हे प्रतिनिधी बसण्यास तयार नव्हते म्हणून कोणाला बसवावे असा मोठा प्रश्न सर्वांपुढे पडत होता. पण अध्यक्ष ११ संघासाठी आशिष शेलारने संघ निवडला. खेळाडूंची संख्या मर्यादित झाल्यानंतर सामना खेळाचे सर्व नियम लागू करून चालू झाला.

सामन्याचे समालोचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करण्यास सुरुवात केली आणि अध्यक्ष ११ संघ सामन्यात वर्चस्व प्रस्थापीत करू लागला. अध्यक्ष ११ संघाने आक्रमणे करण्यास सुरुवात केली. तर सभापती ११ संघाने दुरूनच शुट करण्याचे ठरवले पण अध्यक्ष ११चे गोलकीपर आशिष शेलार यांना यश मिळू दिले नाही.

सामन्यात काही मिनिटे झाल्यावर दोन्ही संघाला खेळाचा चांगला अंदाज यायला सुरु झाला आणि पास देऊन दोन्ही संघ खेळ करू लागले. अध्यक्ष ११साठी महेश लांडगे यांनी स्ट्रायकरच्या भूमिकेत खेळण्यास सुरुवात केली आणि एक- दोन गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. ते फुटबॉल पर्यंत पोहचू शकले नाहीत. काही मिनिटांनी त्यांनी दुरून मारलेली किक गोल जाळ्यात जात होती परंतु सभापती ११च्या गोलकीपरने ती थोपवून लावली. सभापती ११साठी उन्मेष पाटील गोल पर्यंत फुटबॉल घेऊन जात होते पण त्यांना गोल करण्यात अपयश येत होते.

या सामन्याचा निकाल लागू जरी शकला नसला तरी या सामन्यांत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील नागपूर येथील अधिवेशनात क्रिकेटचा सामना त्याच बरोबर महिला आमदारांसाठी देखील सामने घेण्याचा प्रयत्न करू अशी घोषणा केली.