मोठी बातमी – आॅस्ट्रेलियाला मोठा धक्का, सलामीवीर फलंदाज अॅरॉन फिंचला दुखापतीमुळे सोडावे लागले मैदान

पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु असून या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. भारताचा पहिला डाव आज 283 धावांवर संपुष्टात आला असून आॅस्ट्रेलियाकडे 43 धावांची आघाडी आहे.

भारताचा डाव आज दुसऱ्या सत्रात संपुष्टात आल्यानंतर आॅस्ट्रेलियाचा संघ मैदानात फलंदाजीसाठी उतरला. आॅस्ट्रेलियाकडून सलामीवीर फलंदाज अॅरॉन फिंच आणि मार्कस हॅरिस यांनी चांगली सुरुवात केली होती.

पण दुसरे सत्र संपण्याच्या काही वेळाआधी फिंचला उजव्या हाताच्या तर्जनीला(अंगठ्या शेजारील बोट) दुखापत झाली आहे. यामुळे दुसरे सत्र लवकर संपवण्यात आले असून फिंचला एक्स-रे काढण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

त्यामुळे आॅस्ट्रेलियाकडून तिसऱ्या सत्रात मार्कस हॅरिस बरोबर उस्मान ख्वाजा फलंदाजीसाठी आला.

आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील 13 व्या षटकात मोहम्मद शमी गोलंदाजी करत असताना त्याने टाकलेला शॉर्ट बॉल फिंचच्या उजव्या हाताच्या ग्लोव्जला लागला. त्यामुळे लगेचच फिंचने तो ग्लोव्ज काढून आॅस्ट्रेलियाच्या फिजीओला बोलावले. फिजीओने त्यानंतर फिंचची तर्जनीवर उपचार केले. पण त्यानंतर लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

फिंचला दुखापत झाली त्यावेळी आॅस्ट्रेलियाचा संघ बिनबाद 33 धावांवर खेळत होता. तसेच फिंचने 30 चेंडूत 25 धावा केल्या होत्या.

तसेच फिंचने पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली आहे.

फिंचला याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्याआधीही पर्थमध्ये त्याच बोटाला सराव करताना लागले होते. तसेच त्यानंतर अॅडलेड ओव्हल स्टेडीयममध्ये नेटमध्ये सराव करतानाही त्याला त्या बोटाला लागले होते. दोन्ही वेळेस गोलंदाजी आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क करत होता. पण त्यावेळी फिंच गंभीर जखमी झाला नव्हता.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..

विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर पेक्षा १३ डाव कमी खेळताना केला मोठा विश्वविक्रम

तब्बल २६ वर्षांनंतर पर्थमध्ये अशी कामगिरी करणारा विराट कोहली बनला केवळ चौथा भारतीय

दक्षिण आफ्रिका, इंग्लंड नंतर ऑस्ट्रेलियातही विराट कोहलीचा शतकाचा धडाका सुरूच

किंग कोहली बनला असा भीमपराक्रम करणारा पहिलाच आशियाई फलंदाज