इंजिनच्या समस्येनंतरही संजयकडून फिनलँड रॅली पूर्ण

पुणे। सर्वाधिक खडतर आणि आव्हानात्मक अशी जागतिक रॅली मालिकेतील (डब्ल्यूआरसी) फिनलँड रॅली पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने इंजिनमधून ऑईल गळती होऊनही पूर्ण केली. गतवर्षाप्रमाणेच त्याने ही रॅली पूर्ण करीत उल्लेखनीय कामगिरी नोंदविली.

बाल्टीक मोटरस्पोर्टस प्रमोशनने बनविलेली फोर्ड फिएस्टा आर2 कार त्याने चालविली. ब्रिटनचा डॅरेन गॅरॉड त्याचा नॅव्हीगेटर होता. संजयने आर4 गटात 18 जणांत 14वे, तर एकूण क्रमवारीत 49 जणांत 40वे स्थान मिळविले. रॅलीत सहभागी झालेला तो एकमेव भारतीय स्पर्धक होता. 12 स्पर्धकांना तांत्रिक बिघाड किंवा क्रॅशमुळे रॅली पूर्ण करता आली नाही. अशावेळी संजयने तांत्रिक बिघाडांचा परिणाम रॅली पूर्ण करण्यावर होऊ दिला नाही, पण यामुळे आणखी बरचा क्रमांक मिळविण्याच्या त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्याला तसा धोका पत्करता आला नाही.

संजयने सांगितले की, यंदा रॅली पूर्ण करण्याचे प्राथमिक उद्दीष्ट साध्य करून गतवर्षीचा क्रमांक कायम राखला याचे समाधान आहे. एकूण कामगिरीविषयी मी समाधानी आहे. गतवर्षीपेक्षा वेगाचे सातत्य जास्त होते. त्यामुळे भविष्यासाठी चांगली तयारी करता येईल. माझ्या गटातील बहुतेक कार टर्बोयुक्त व नव्या होत्या. माझ्या कारला टर्बो नव्हता. त्यामुळे किलोमीटरला दीड ते दोन सेकंदांचा फरक वेगात होता.

23 स्पेशल स्टेजेसची रॅली तीन दिवस चालली. एकूण अंतर 307.58 किलोमीटर होते. तीन तास 41 मिनिटे 50.3 सेकंद पेनल्टी वेळेसह संजय-गॅरॉड यांनी रॅली पूर्ण केली.

शुक्रवारी पहिल्या सुपर स्पेशल स्टेजनंतर इंजिनमधून ऑईलची गळती सुरु झाली. यानंतरही संजयने निर्धारीत वेळेत कार पार्क फर्मेपर्यंत नेली. रॅलीदरम्यान स्पर्धकांच्या कार तेथे ठेवल्या जातात. तांत्रिक दुरुस्ती किंवा कोणत्याही कारणासाठी कारला स्पर्श करता येत नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना सर्व्हिसिंगसाठी केवळ 15 मिनिटे मिळाली. त्यात हिटींग सेन्सर बदलून संजयने रॅली सुरु केली. पहिल्या दोन स्टेज वेग समाधानकारक होता. पहिल्या सर्व्हिस ब्रेकच्या वेळी सर्व्हिस पार्कमधून बाहेर येण्यास दोन मिनिटे उशीर झाल्यामुळे त्याला 20 सेकंदांची पेनल्टी बसली. 40 मिनिटांच्या सर्व्हिसमध्ये त्यांना कार पुरेशी नीट झाली नाही. त्याचा ब्रेकवर परिणाम झाला होता. वीशबोन आणि एक लोअर आर्म मोडल्यामुळे संजयला कॉर्नरवर सफाईने वेग राखण्यास आणि थोडा नंतर ब्रेक दाबण्यास अडथळा येत होता. अशातही सकाळी सात वाजता सुरु होऊन रात्री दहा वाजता संपलेला पहिला लेग त्याने पूर्ण केला.

शनिवारी इंजिन गास्केटला क्रॅक जोऊन ते गरम होऊ लागले. प्रत्येक स्टेजनंतर बॉनेट उघडून त्यात पाणी टाकत संजय-गॅरॉड यांनी रॅली सुरु ठेवली. नियमानुसार इंजिन बदलण्याची परवानगी नसते. स्पर्धकांना 22 टायर्स आणि एक इंजिन इतकेच मिळते. वरच्या गिअरमध्ये नियंत्रीत ड्रायव्हिंग करीत त्याने आठ स्टेजेस पूर्ण केल्या. 40 मिनिटांच्या दोन सर्व्हिसमध्ये त्यांना तांत्रिक बिघाड पूर्णपणे दुरुस्त करता आला नाही. शनिवारी प्रारंभी गटातील 21व्या क्रमांकानंतर त्याने 15व्या क्रमांकापर्यंत प्रगती केली. मग रविवारी त्याने एक क्रमांक उंचावला.