पहिल्या पीवायसी-राजू भालेकर करंडक 2018 निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे पहिल्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक  2018 निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा  पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर 16 ते 25 सप्टेंबर 2018 या कालावधीत रंगणार आहे.

पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे, पीवायसी हिंदू जिमखानाच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड आणि स्पर्धेचे प्रायोजक गोल्डफिल्ड प्रॉपर्टीजचे अनिल छाजेड आणि टी.एन.सुंदर यांनी सांगितले की, स्पर्धेत पूना क्लब, डेक्कन जिमखाना, कॅडेन्स, क्लब ऑफ महाराष्ट्र, व्हेरॉक वेंगसरकर अकादमी आणि पीवायसी हिंदू जिमखाना आणि एमसीएने निवड केलेले दोन संघ असे 8 निमंत्रित संघ सहभागी झाले असून माजी महाराष्ट्राचे कर्णधार राजू भालेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ क्लबच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज यांनी प्रायोजित केल्याने आम्ही त्यांचे आभार असल्याचे द्रविड यांनी सांगितले.

तसेच, हि स्पर्धा एकदिवसीय स्वरूपाची 45 षटकांची घेण्यात येणार असून यामुळे कुमार स्तरावर अधिक चुरशीची अशी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. स्पर्धेतील सहभागी 8संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून हि स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.

अनिल छाजेड म्हणाले की, क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांशी जोडले जाणे हा एक आनंददायक अनुभव असतो. त्यातच जेव्हा असे उपक्रम गुणवान खेळाडूना लक्ष ठेवून केलेले असतात. पीवायसी येथे होणाऱ्या या स्पर्धेबाबतही असेच म्हणता येईल.

या स्पर्धेसाठी सर्व सुविधा आणि क्रीडा साहित्य तर देणार आहोतच पण या स्पर्धेतून पुढे येणाऱ्या गुणवान खेळाडूंना त्यांच्या कारकिर्दीत सर्वोतोपरी मदत करणार आहोत. दरवर्षीप्रमाणेच या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून जोडले जाण्यात गोल्डफिल्ड समूहाला नेहमीच अभिमान वाटतो.

गोल्डफिल्ड हॉस्पिटॅलिटी समूहाचा केंद्रबिंदू क्रीडा क्षेत्र हाच असून या समूहाच्या दूरदृष्टीचा एक भाग म्हणून दापोली येथे 40एकर जागेत अत्याधुनिक अशा क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात येत आहे.

या क्रीडा संकुलात 80 यार्ड सीमारेषा असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आणि आधुनिक सुविधांचा समावेश आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान, सेंटर कोर्टसह 7 टेनिस संकुल रनिंग ट्रॅक कब्बडीसाठी विशेष मैदान, मुष्ठीयुद्ध संकुल आणि इंडोर स्विमिंम्ग पूल यांचा समावेश आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बीसीसीआयच्या वतीने 19 वर्षाखालील मुलांसाठी एकदिवसीय स्पर्धांना प्रारंभ होत असून या स्पर्धेमुळे आगामी मौसमासाठी सर्व खेळाडूंना तयारी करण्यास मदत मिळणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना राजू भालेकर करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांनादेखील पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे 50000/- रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे उदघाटन स्व. राजू भालेकर यांच्या पत्नी रिजूता भालेकर यांच्या हस्ते 16 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 8.30वाजता पीवायसी क्रिकेट मैदानावर होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

-कूक-पीटरसनमध्ये मैत्रीचे नवे पर्व?

-काय आहे मॅकग्राचे अँडरसनला नवीन आव्हान?

-क्रिकेटकडून टेनिसकडे वळालेल्या ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने मिळवले युएस ओपनचे विजेतेपद