पहा: जेव्हा चेतन शर्माने घेतली होती हॅट्रिक; तेही ३ क्लीन बोल्ड !

कोलकाता । काल वनडेमध्ये हॅट्रिक घेणारा कुलदीप यादव हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कपिल देव आणि चेतन शर्मा यांनी हॅट्रिक घेतली आहे. कुलदीपची ही आंतरराष्ट्रीय वनडेमधील पहिली हॅट्रिक नाही, त्याने २०१४ साली स्कॉटलँड विरुद्ध अंडर-१९ वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट घेतली होती.

याबरोबरच चेतन शर्माच्या त्या खास हॅट्रिकचीही आठवण होणे ओघानेच आले. १९८६ मध्ये काही काळासाठी, चेतन शर्मा हा भारतातील सर्वात नावडत्या क्रिकेटपटू मधील एक होता, कारण १९८६ च्या ऑस्ट्रेलिया-आशिया कपच्या अंतिम सामन्यत त्याने शेवटच्या चेंडूत जावेद मियांदादकडून षटकार खाला होता आणि भारताने तो सामना हरला होता.

पण, त्यानंतर त्याने दोन सनसनाट्या कामगिरीसह संघात पुनरागमन केले, त्यातील पहिली कामगिरी इंग्लंडमधील मालिकेत १६ बळी आणि दुसरी भारताच्या विश्वचषकच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित क्षणांपैकी एक आहे म्हणजेच विश्वचषकातील पहिली हॅट्रिक.

१९८७ मध्ये भारताने चांगली कामगिरी करत विश्वचषकाची सुरुवात केली होती. जेव्हा भारतीय संघ साखळी फेरीतील अंतिम सामना खेळायला उतरला तेव्हा भारताची जागा उपांत्य सामन्यात निश्चित होती. सामना नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता आणि न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करत होता.

दीपक पटेल यांच्या ४० आणि जॉन राइट यांच्या ३५ धावांच्या जोरावर न्यूझीलंड संघाची स्तिथी १८१-५ अशी होती. या टप्प्यावर चेतन शर्मा गोलंदाजीस आला. त्याने रदरफोर्ड, इयान स्मिथ आणि ईवान चॅटफिल्ड या तीन न्यूझीलंडच्या फलंदाजांना तीन चेंडूत बाद केले व तेही त्रिफळाचित.

असे करत तो जगातील तिसरा तर भारताचा पहिला गोलंदाज बनला ज्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅट्रिक घेतली होती. त्याच बरोबर विश्वचषकात हॅट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज बनला.

न्यूझीलंडने २२१ धावा केल्या आणि भारताने सुनील गावसकरच्या ८८ चेंडूत १०३ आणि कृष्णा श्रीकांतच्या ५८ चेंडूत ७५ धावांच्या जोरावर सामना जिंकला. या सामन्याचा मानकरी शतकवीर सुनील गावस्कर आणि हॅट्रिक मॅन चेतन शर्मा हे दोघेही होते.

व्हिडिओ