अॅडलेड कसोटी जिंकत विराट कोहलीच्या टीम इंडियाने घडवला इतिहास

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

या विजयाबरोबरच भारतीय संघाने 70 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना जिंकला आहे. सध्या सुरु असलेली कसोटी मालिका ही भारताची आॅस्ट्रेलियामधील 12 वी कसोटी मालिका आहे.

याआधी आॅस्ट्रेलियामध्ये झालेल्या 11 कसोटी मालिकेत एकदाही भारताला पहिला कसोटी सामना जिंकता आलेला नाही. या 11 कसोटी मालिकेत 9 वेळा भारताने पहिला कसोटी सामन्यात पराभव स्विकारला आहे, तर दोन वेळा पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे.

त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच आॅस्ट्रेलियन भूमीत आॅस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकून इतिहास रचला आहे.

त्याचबरोबर आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेचा पहिला कसोटी सामना जिंकणारा भारत दुसरा आशियाई संघ ठरला आहे. याआधी पाकिस्तानने 1978-79 मध्ये मेलबर्न येथे झालेला आॅस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला होता. त्या मालिकेत आॅस्ट्रेलियाने 1-1 अशी बरोबरी केली होती.

तसेच भारत हा एका कॅलेंडर वर्षात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई संघ ठरला आहे. भारताने यावर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जानेवारीमध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना जिंकला होता.

तसेच इंग्लंडमध्येही आॅगस्ट महिन्यात झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ब्रिस्बेन झालेला तिसरा कसोटी सामना जिंकला होता. आता भारताने आॅस्ट्रेलिया विरुद्धही आॅस्ट्रेलियन भूमीत विजय मिळवत कसोटी मालिकेची विजयी सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

जे कोणत्याही आशियाई कर्णधाराला जमले नाही ते विराट कोहलीने करुन दाखवले!

काय सांगता! टीम इंडियाने १० वर्षांनी आॅस्ट्रेलियात जिंकला कसोटी सामना

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: अॅडलेड कसोटीत भारताचा ३१ धावांनी विजय