प्रथम व्हिन्टेंज आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: सिमन्स संघाने पटकावले विजेतेपद; अंतिम लढतीत उडविला टीसीएसचा धुव्वा

पुणे। विजयासाठी फेव्हरिट समजला जात असलेल्या आणि संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त खेळ करणा-या टीसीएस संघाने प्रथम व्हिन्टेंज कप आय-टी टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत मात्र सिमन्स संघासमोर शरणागती पत्करली. सिमन्स संघाने सौरभ जळगावकरचे अर्धशतक आणि निखिल पाटील, नमन शर्मा यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर टीसीएस संघावर ७३ धावांनी मात करून विजेतेपद पटकावले. सिमन्स संघाने दिलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीसीएसचा डाव १५.५ षटकांत ९८ धावांत आटोपला.

प्रथम स्पोर्टस आयोजित या स्पर्धेची अंतिम लढत नेहरू स्टेडियमवर रंगली. सिमन्स संघाच्या फलंदाजांनी टीसीएसच्या गोलंदाजांचा समाचार घेत प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १७१ धावांपर्यंत मजल मारली. हिमांशू अगरवाल दुस-याच षटकात बाद झाल्यानंतर अतुल पवार आणि सौरभ जळगावकर यांनी दुस-या गडीसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अतुल पवार २० धावांवर बाद झाला. अर्धशतकानंतर सौरभही माघारी परतला. त्याने ४० चेंडूंत ६ चौकार व १ षटकारसह ५० धावा केल्या. यानंतर सौरभ डी.ने १९ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३४, तर विशाल रैनाने २२ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३७ धावा करून सिमन्स संघाला १७१ धावांपर्यंत पोहोचविले.

यानंतर सिमन्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक मारा करून टीसीएसच्या फलंदाजांवर अंकुश राखला. दबाबात आलेले टीसीएसचे फलंदाज खराब फटके मारून बाद झाले. निखिल पाटीलने पहिल्याच षटकात मयंक जसोरे, गौरवसिंग आणि विक्रमजितसिंग यांना बाद केले. मयंक आणि गौरव या दोघांना तर खातेही उघडता आले नाही. पहिल्या षटकाअखेर टीसीएसची ३ बाद ६ अशी अवस्था झाली होती. पुढच्या षटकात गौरव भालेराव बाद झाला, तर निखिलने आपल्या पुढच्या षटकात तेजपालसिंगला बाद केले. टीसीएसचा निम्मा संघ अवघ्या ७ धावांत माघारी परतला होता. सहाव्या षटकात निकुंज अगरवालही बाद झाला. या वेळी टीसीएसच्या फलकावर केवळ अकरा धावा लागल्या होत्या. शंतनू नाडकर्णीने २८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३५, तर अभिनव कालियाने २१ चेंडूंत २३ धावा जोडून टीसीएसची लाज राखली. नमन शर्माने अचूक मारा करून टीसीएसच्या तळाच्या तीन फलंदाजांना बाद केले. निखिल पाटीलने चार, तर नमनने तीन गडी बाद केले. अंतिम लढतीत सिमन्सला कमी लेखण्याची चूक टीसीएस संघाला चांगलीच महागात पडली.

पारितोषिक वितरण समारंभात वरिष्ठ व्यवस्थापक सौरभ कुमार, माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर, किरण इंगळे, इंडियन बॅंकचे अश्वनी सिंग, क्लब ऑफ महाराष्ट्रचे अविनाश कोकाटे, अविनाश पाटील, प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे संचालक भूषण डांगे, अमित जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वोत्कृष्ट फलंदाज – हिमांशु अग्रवाल,

सर्वोत्कृष्ट गोलंदाज – अभिनव कलिया

मालिकावीर – स्वप्निल साळवी

संक्षिप्त धावफलक – सिमन्स – २० षटकांत ५ बाद १७१ (सौरभ जळगावकर ५०, सौरभ डी. ३४, विशाल रैना नाबाद ३७, अतुल पवार २०, मयंक जसोरे ४-०-२५-१, सुनील बाबर ४-०-२०-१, अभिनव कालिया ४-०-२३-१, गौरव सिंग ४-०-४५-१) वि. वि. टीसीएस – १५.५ षटकांत ९८ (शंतनू नाडकर्णी ३५, अभिनव कालिया २३, निखिल पाटील ४-०-१४-४, नमन शर्मा ३-०-२३-३, दीपककुमार ३.५-१-१२-२).