चेल्सी विरुद्ध रोमा सामन्यातील पाच मुख्य बाबी

चॅम्पियन्स लीगच्या ‘ग्रुप सी’ मध्ये आज पहाटे चेल्सी आणि एएस रोमा या दोन संघात सामना झाला. या सामन्यात रोमाने चेल्सीचा ३-० असा पराभव केला. या विजयासह रोमाचे पुढील फेरी म्हणजे नॉक आऊट फेरीतील स्थान पक्के झाले आहे. या सामन्याअगोदर रोमा ग्रुपमध्ये तिसऱ्या स्थानावर होते ते या विजेमुळे ८ गुणांसह पहिल्या स्थानावर पोहचले आहेत.

या सामन्यातील पाच महत्वाच्या गोष्टी-
१ पराभवाची जबादारी अंतोनिओ कान्टे यांनी घेण्याची गरज-
या सामन्यात प्रशिक्षक म्हणून कान्टे सपशेल अपयशी ठरले. त्यांनी संघात निवडलेल्या खेळाडूंपासून ते बदली खेळाडू यांच्या निवडीत ते चुकीचे ठरले. त्यांनी मुख्य संघात फॅब्रीगास आणि बोकायोको या खेळाडूंना खेळवून चूक केली,त्याचबरोबर त्यांनी गॅरी काहील याला त्याच्या लेफ्ट सेन्टर बॅक जागेवर न खेळवता राईट सेन्टर बॅक खेळवले. हे सर्व निर्णय रोमा विरुद्धच्या सामन्यात सपशेल आपटले.

कान्टे यांनी बदली खेळाडूंमध्ये देखील चूक केली. त्यांनी काहील याला बदली करून विलियन याला संघात स्थान दिले. त्यामुळे एका डिफेंडरची जागा कमी झाली. विलियन याच्या संघात आल्याने पेड्रो याला मिडफिल्डमध्ये न खेळता इच्छेविरुद्ध राईट विंग बॅक या जागेवर खेळावे लागले.

या सामन्यातील सर्व निर्णय चुकल्याने कान्टे यांना क्लबच्या पाठीराख्यांना आणि क्लब मधील सदस्यांना या बाबतची उत्तरे द्यावी लागतील.

२ एएस रोमाच्या आघाडीवीरांची जबरदस्त कामगिरी-
ईल शरावे याने सामन्याच्या ३९व्या सेकंदालाच गोल करत रोमा संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर त्याने चेल्सीच्या डिफेन्सकडून झालेल्या चुकीचा फायदा उचलत दुसरा गोल करून आघाडी २-० अशी वाढवली.

एडिन झेको या सामन्यात गोल करण्यात अपयशी ठरला तरी देखील त्याने या सामन्यात चेल्सी संघातील डिफेंडर्सच्या नाकी नऊ आणले. त्याने या सामन्यात एका बाजूने सामन्याची सर्व सूत्रे हाती घेतली आणि दुसऱ्या बाजूला बाकीच्या आघाडीवीरांसाठी जागा मोकळी केली. त्यामुळे या सामन्यात त्याचा रोमा संघाला खूप फायदा झाला.

तिसरा आघाडीवर पेरोट्टी याने गॅरी काहील याला या सामन्यात पूर्णपणे निस्तेज केले. त्याने विंगवरून सतत आक्रमणे केली आणि प्रत्येक वेळेला काहीलला चुकवण्यात तो यशस्वी झाला.

३ चेल्सीला भासली एन गोलो कान्टे याची कमी –
चेल्सी संघातील नंबर ७ आणि या संघाचा मुख्य मिडफिल्डर एन गोलो याची या संघाला या सामन्यात कमी जाणवली. मागील काही सामन्यात तो दुखापतग्रस्त असल्याने खेळू शकलेला नाही. त्याच्या अनुपस्थितीत चेल्सी संघाची मिडफिल्ड खूप कमकुवत भासते आहे. गोलो याची गोल करण्यास संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता आणि त्याचबरोबर त्याचे डिफेन्समधील योगदान खूप जास्त असते. तो संघात नसल्याने चेल्सी या विभागात खूप कमी पडले.

४रोमाचे पुढील फेरीतील स्थान निश्चित-
या सामन्यापूर्वी रोमा संघ ग्रुप सी मध्ये तिसऱ्या स्थानावर होता. या सामन्यातील ३-० विजयामुळे हा संघ या ‘ग्रुप सी’ मध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाला. रोमाने ४ सामन्यात ८ गुण मिळवत आपले पुढील फेरीतील स्थान निश्चित केले आहे. चेल्सी या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्याचे कारण देखील तेच आहेत.

हे दोन्ही संघ पुढील फेरीच्या सामन्यात जवळजवळ पात्र ठरले आहेत, याचे मुख्य कारण अथलेटिको माद्रिदचा खराब खेळ आहे. माद्रिद संघाने त्यांच्या काराबाग संघाविरुद्धच्या दोन्ही लढती बरोबरीत सोडवल्या आहेत. काराबाग या संघाला चेल्सीने पहिल्या सामन्यात ६-० असे हरवले होते.

चेल्सी आणि रोमा यांनी त्यांचे अथलेटिको माद्रिद विरुद्धचे सामने जरी बरोबरीत सोडवले तर दोन्ही संघ पुढील फेरीसाठी पात्र असतील. जर ते तसे करण्यात अपयशी ठरले तर त्यांना काराबाग विरुद्धचा सामना जिंकावा लागेल जे त्यांनी सुरुवातीच्या सामन्यात केलेले आहे.

५ चेल्सी संघात बदलाचे वारे –
या सामन्यातील पराभवानंतर चेल्सी संघाला त्यांच्या खेळात खूप बदल करावे लागतील. गतवर्षीं ते ईपीएलचे विजेते असले तरी त्यांना वनवीन शैलीने खेळावे लागेल. या संघाच्या खेळाच्या शैलीला रोमाने ओळखून मागील १३५ मिनिटात ६ गोल केले आहेत.

बदलाची सुरुवात मुख्य संघाच्या निवडीपासूनकेली जाण्याची शक्यता आहे. सेस फॅब्रीगास याला खाली बसवून गोलो कान्टे आणि डॅनी ड्रिंकवॉटर या जोडीला संधी दिली पाहिजे. हेडन खेळाडू एकमेकांचा खेळ चांगला ओळखतात आणि ते सोबत मोठी कामगिरी करू शकतात.