क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरला अर्जुन पुरस्कार !

नुकत्याच झालेल्या २०१७ महिला विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीत कौरला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हरमनप्रीतची इंग्लंडमधील डर्बी येथील विश्वचषकातील उपांत्य सामन्यातील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या १७१ धावांची धडाकेबाज खेळी आज ही प्रत्येक क्रिकेट प्रेमींच्या लक्षात आहे.

हरमनप्रीत कौर ही मूळची पंजाब येथील मोगा या गावातील आहे. तिचे वडील हे व्हालीबॉल आणि बास्केटबॉल खेळाडू होते. त्यामुळे खेळाचे संस्कार तिच्यावर लहानपानापासूनच झाले.

तिने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २००९च्या महिला विश्वचषकामधे पाकिस्तान विरुद्ध वयाच्या २०व्या वर्षी खेळला. तिने तिच्या आतापर्यंतच्या एकदिवसीय कारकिर्दीत ७८सामने खेळले आहे ज्यात तिने २०२५ धावा केल्या आहेत. तिची सरासरी ३६ची आहे आणि स्ट्राईक रेट ७०चा आहे. तिने भारतासाठी मधल्या फळीत फलंदाजी करताना ३ शतके तर १० अर्धशतकेही लगावली आहेत.

एकदिवसीय क्रिकेट बरोबरच ती टी-२० क्रिकेटमध्ये हि भारतीय महिला संघात आहे. तिने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये ६८ सामन्यात १२२३ धावा केल्या आहेत. त्याच याबरोबर ती भारतीय टी-२० संघाची कर्णधार देखील आहे.

हरमनप्रीत हि पहिली भारतीय क्रिकेटर आहे जिने ऑस्ट्रेलियाच्या महिला बिग बॅश या टी-२० स्पर्धेत सिडनी थंडर्स या संघाशी करार केला. तिने त्या स्पर्धेत चांगली कामगिरी करून स्पर्धा गाजवली देखील होती.

यावर्षी अर्जुन पुरस्कार मिळणारी ती चेतेश्वर पुजारासह दुसरी क्रिकेटपटू आहे.