काय झालं होत नक्की जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाच्या गाडीवर दगडफेक झाली ?

गुवाहाटी । परवा भारतीय संघावर विजय मिळवल्यावर जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ हॉटेलकडे जात होता तेव्हा या संघाच्या बसवर दगडफेक झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक चाहत्यांनी सॉरी ऑस्ट्रेलिया असे फलक घेऊन हॉटेल आणि विमानतळावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंची माफी मागितली.

आज ऑस्ट्रेलिया संघाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक विडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात ऑस्ट्रेलिया संघाचा फिरकी गोलंदाज ऍडम झाम्पा हा सर्व घटनाक्रम सांगताना दिसत आहे.

झाम्पा म्हणतो, ” मी मोठ्या आवाजात हेडफोन लावून गाणी ऐकत होतो आणि बसमधून दुसऱ्या बाजूला पाहत होतो. तेवढ्यात खूप मोठा आवाज झाला. ”

“५-६ सेकंद मला हे खूप भीतीदायक वाटलं. आमच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने लगेच हा दगड असल्याचं आम्हाला सांगितलं. असं यापूर्वी आमच्यासोबत झालं नव्हतं. खूप भीती यावेळी वाटली. यापूर्वी बांग्लादेशातही असे झाले होते. आम्ही सर्वजण सुखरूप होतो. ”

भारतीय चाहत्यांबद्दल:
झाम्पा पुढे म्हणतो, ” भारतीय चाहते हे खूप मोठे क्रिकेटप्रेमी आहेत. त्यामुळे येथे प्रवास करणे हे खूप कठीण जाते. ते क्रिकेटवर खूप प्रेम करतात आणि त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते. एका व्यक्तीमुळे सर्वजण बदनाम होतात. तसेही गुवाहाटीमध्ये खूप कमी क्रिकेट खेळले जाते. “