बीसीसीआयचे माजी व्यवस्थापक एमव्ही श्रीधर यांचे निधन

हैद्राबाद संघाचे माजी कर्णधार एम व्ही श्रीधर यांचे आज हैद्राबादमध्ये हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांनी नुकतेच बीसीसीआयच्या व्यवस्थापक पदाचा राजीनामा दिला होता.

हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते परंतु त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

श्रीधर २०१३ पासून बीसीसीआयच्या व्यवस्थापक पदावर होते. तसेच त्यांनी प्रशासनात वेगवेगळ्या पदावर अनेक वर्षांसाठी काम केले आहे.

त्यांनी हैद्राबादसाठी १९८८ ते २००० पर्यंत खेळताना ९७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यात त्यांनी २१ शतके आणि २७ अर्धशतके ठोकली आहेत. त्यांनी एकूण ६७०१ धावा आहेत. त्याचबरोबर ते अ श्रेणीचेही ३५ सामने खेळले होते त्यात त्यांनी ९३० धावा केल्या होत्या. यात त्यांनी ५ अर्धशतके केली आहेत.

तसेच रणजी ट्रॉफी स्पर्धेत वयक्तिक सर्वाधिक खेळी करण्याच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी १९९४ साली आंध्रप्रदेश विरुद्ध ३६६ धावांची खेळी केली होती.

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी म्हणाले ” माझ्या मित्राला श्रीधरच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांनी क्रिकेट प्रशासनात आणि एक खेळाडू म्हणून मोलाचे योगदान दिले आहे. ते खूप लवकर गेले. “

भारतीय संघातील अन्य खेळाडूंनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.