विम्बल्डन: भारतीय खेळाडूंचे आज होणारे सामने

आज चार भारतीय खेळाडूंचे विम्बल्डनमध्ये चार वेगवेगळ्या विभागात सामने होणार आहे. यात सानिया मिर्झा, पूरव राजा या दिग्गजांसह महाराष्ट्राच्या सिद्धांत बांठिया व महेक जैन या खेळाडूंचेही सामने कनिष्ठ गटात होणार आहेत.

पुरुष दुहेरीत भारताचं आव्हान संपुष्ठात आल्यानंतर आता भारतीय टेनिस प्रेमींच्या सर्व नजरा या मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीवर आहेत. रोहन बोपण्णा, सानिया मिर्झा, पुरव राजा या दिग्गजांबरोबर कनिष्ठ गटात सिद्धांत बांठिया, महेक जैन, मिहिका यादव आणि झील देसाई या खेळाडूंनी भारतीयांचं आव्हान जिवंत ठेवलं आहे.

मिश्र दुहेरी
आज सातव्या दिवशी भारताच्या ४ खेळाडूंचे सामने विम्बल्डनमध्ये होणार असून मिश्र दुहेरीत पूरव राजा आणि त्याची जोडीदार इरी होझुमी यांचा दुसऱ्या फेरीचा सामना डॅनियल नेस्टर आणि अँड्रेजा क्लेपकशी होणार आहे. पूरव राजाने जपानच्या इरी होझुमीच्या साथीने मिश्र दुहेरीतील पहिल्या फेरीत जेम्स केरेटानी (अमेरिका) व रेनाटा व्होराकाव्हा (चेक प्रजासत्ताक) जोडीला ५-७, ६-४, ६-२ असे नमवले.

महिला दुहेरी
महिला दुहेरीमध्ये सानिया मिर्झा आणि जोडीदार बेल्जियमच्या क्रिस्टन फ्लिपकेन्ससह दुसरी फेरी गाठली असून त्यांचा सामना आता तृतीय मानांकित मार्टिना हिंगीस आणि युंग जान चॅन जोडीशी होईल. सानिया-क्रिस्टन जोडीने पहिल्या फेरीत ब्रिटनच्या नाओमी ब्रॉडी आणि हिदर वॉटसन जोडीवर ६-३, ३-६, ६-४ असा विजय मिळवला होता.

कनिष्ठ गटात आज:

मुलांची एकेरी
पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवलेल्या महाराष्ट्राच्या सिद्धांत बांठियाची पहिल्या फेरीची लढत आज फ्रान्सच्या मॅट मार्टिनेऊ याच्याशी होणार आहे.

मुलींची एकेरी
पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवलेल्या महाराष्ट्राच्या महेक जैनचा मुलींच्या पहिल्या फेरीचा सामना क्रोएशियाच्या लिआ बोस्कोव्हिचशी होणार आहे.