४ कारणे ! अजिंक्य रहाणेला टी२० संघात स्थान द्यायलाच हवे होते !

रांची । उद्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ टी२० सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना येथे होणार आहे. गेल्या आठवड्यात या मालिकेसाठी संघ निवड झाली. यातील सर्वात धक्कादायक निर्णय म्हणजे अजिंक्य रहाणेला संघातून वगळणे. सुनील गावसकर यांच्यासारख्या दिग्गज महान माजी खेळाडुनेही याबद्दल भाष्य करताना निवड समितीवर ताशेरे ओढले.

अजिंक्य रहाणेला या संघात का स्थान दिले जावे यासाठी अनेक कारणे आहेत. त्यातील काही ठळक कारणे-

१. अजिंक्य रहाणेचा सध्याचा फॉर्म
अजिंक्य राहणे विंडीज, श्रीलंका दौरा आणि भारतात ऑस्ट्रेलिया विरुद्ध असे मिळून ११ सामने खेळला. त्यात त्याने ५३.१८च्या सरासरीने ५८५ धावा केल्या आहेत. या कालावधीत वनडे क्रिकेटमध्ये जगातील फक्त कोहली आणि रोहित शर्मा यांनी जास्त धावा केल्या आहेत. या ११ डावात रहाणेने १ शतक आणि ७ अर्धशतके केली आहेत. तर एका सामन्यात तो ३९ धावांवर बाद झाला आहे. या काळात त्याने ६३ चौकार मारले आहे त्यापुढे केवळ विराट कोहली ७१ चौकारांसह आहे.

२. सलामीवीर म्हणून शिखर/ रोहितसाठी एक चांगला बॅकअप
भारतीय कर्णधार विराट कोहलीने आता टी२० मध्ये सलामीला खेळायचा हट्ट सोडायला हवा. भारताकडे तीन खास सलामीवीर असूनही विराट टी२० प्रकारात सलामीला येतो. त्याऐवजी शिखर आणि रोहित या सलामीवीरांना कायम ठेवून एक बॅकअप म्हणून रहाणेकडे पहिले पाहिजे. कोणत्याही दौऱ्यात ह्या खेळाडूला त्याच्या कामगिरीच्या जोरावर स्थान देण्यात यावे.

३.कोणत्याही क्रमांकावर खेळायची तयारी
एकावेळी राहुल द्रविड हा भारतीय संघासाठी कोणतीही जबाबदारी सांभाळायला तयार असायचा. अगदी कर्णधार, यष्टीरक्षक, सलामीवीर, ते कोणत्याही क्रमांकावर खेळायला तयार असणारा खेळाडू म्हणून द्रविडकडे पहिले जात असे. आजच्या भारतीय संघात अजिंक्य रहाणे सोडला तर असा एकही खेळाडू आपणास दिसणार नाही. रहाणे कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी कायम तयार असतो. अन्य खेळाडू हे कोणत्या क्रमांकावर खेळायचे यासाठी सतत कुरबुरी करत असतात.

४.केएल राहुलपेक्षा रहाणे कधीही सरस
केएल राहुल हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही वनडेत खेळला नाही. कर्णधार कोहलीने त्याला संधीच दिली नाही. त्याचवेळी रहाणेने सलग चार अर्धशतके केली. एवढी चांगली कामगिरी करूनही केएल राहुलला संघात स्थान देण्यात आले. संघात स्थान मिळवण्यासाठी जर चांगली कामगिरी हेच उत्तर असेल तर रहाणे केएल राहुलच्या बराच पुढे आहे. केएल राहुलने जानेवारी २०१६ पासून चांगली कामगिरी केली आहे परंतु तो सलामीला सोडून बाकी क्रमांकावर अडखळताना दिसतो. जानेवारी २०१७पासून ७ सामन्यातील ६ डावात केएल राहुलने जेमतेम ५२ धावा केल्या आहेत. जगात असे किती संघ आहेत जे एखाद्या खेळाडूला कसोटी आणि टी२० प्रकारात स्थान देतात परंतु वनडेत देत नाही. केएल राहुलकडे पाहून भारतीय संघ असा एकमेव संघ दिसतो आहे. जर तुमच्या संघात दोन सलामीवीर सतत चांगली कामगिरी करत आहे आणि रहाणे सारखा तुमच्याकडे बॅकअप आहे तर केएल राहुलला संधी कशी?