फ्रेंच ओपनचा थरार अंतिम टप्प्यात

भारतीय क्रिडा रसिकांचे डोळे सध्या इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफीकडे लागले असताना इंग्लडचाच शेजारी देश असणाऱ्या फ्रान्सच्या पॅरिस शहरात ऐतिहासिक ४ ग्रँडस्लॅमपैकी एक असणारी वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच ओपन रंगदार अवस्थेत पोहचली आहे.क्ले कोर्टचा राजा अर्थातच राफेल नदाल नोव्हाक जोकोविच, स्टान वावरिंका, अँडी मरे यांनी पुरूष एेकेरीत तर कैरोलिन गार्सिया, ईलिना स्वेतलेना, कैरोलिना प्लिस्कोवा आणि सिमोन हिलेप यांनी महिला एकेरीत उपांत्य-पूर्व फेरित आपले स्थान पक्के केले आहे.

फ्रेंच ओपन स्पर्धेचा इतिहास मोठा आहे. या स्पर्धेचे नाव ” रोलैंड गर्रोस टूर्नामेंट” असे असले तरी “फ्रेंच ओपन”या नावानेच ही स्पर्धा ओळखली जाते. “रोलैंड गर्रोस”ज्यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात फ्रेंच सैन्यात वैमानिक म्हणूण आपले योगदान दिले त्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

१२६ वर्षांपूर्वी १८९१ साली फ्रेंच ओपनला सुरूवात झाली. पहिल्या काही वर्षांमध्ये फक्त फ्रेंच खेळाडूंनाच स्पर्धेत भाग घेता येत असे. पण १९२५ पासून फ्रेंच ओपन सर्व आंतराष्ट्रीय टेनिसपटूंसाठी खुली करण्यात आली. आंतराष्ट्रीय स्तरावर ज्या महत्वाच्या ग्रँडस्लम टेनिस स्पर्धा होतात त्यामध्ये फ्रेंच ओपनला मानाचे स्थान आहे. ही स्पर्धा लाल मातीवर म्हणजेच क्ले कोर्टवर खेळवली जाते. ग्रास कोर्टपेक्षां क्ले कोर्टवर खेळणे जरा अवघड असते, कारण इथे मातीमुळे टेनिस बॉलचा वेग मंदावतो व टप्पा उंचावतो त्यामुळे खेळाडूंना आपल्या वेगावर नियंत्रण आणावे लागते. ह्याच कारणामुळे इथे खेळाडूंच्या कौशल्याचा कस लागतो.

अनेक मातब्बार खेळाडूंना आजपर्यंत यामूळेच या स्पर्धेत यश मिळिवता आले नाही. एकेवेळी ग्रँडस्लॅम स्पर्धेची सर्वाधिक विजेतेपद आपल्या नावावर करणाऱ्या पिट सम्प्राससारख्या दिग्गजाला ही स्पर्धा कधीच जिंकता आली नाही. आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत फक्त एकवेळा तो उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकला. राँजर फेडरर सारख्या विंम्बलडन,आँस्ट्रेलियन ओपन,यू.एस ओपन या स्पर्धांवर अधिराज्य केलेल्या खेळाडूच्या वाटेला फ्रेंच ओपनचे फक्त एकच विजेतेपद आले आहे. तर दुसरीकडे क्ले कोर्टला साजेशी खेळ शैली असल्याने राफेल नडाल क्ले कोर्टचा अनभिषिक्त बादशहा बनला आहे. त्याने तब्बल नऊ वेळा फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवले आहे.

फ्रेंच ओपनमध्ये भारतीय खेळाडूंना एकेरीमध्ये जरी विशेष चमक दाखवता आली नसली तरी दुहेरीमध्ये लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनी चांगली कामगिरी केली आहे.

राँजर फेडरर, सरेना विलियम्स, मारिया शारापोवा यांच्यासारखे दिग्गज खेळाडू यावर्षीच्या फ्रेंच ओपनमधे सहभागी झाले नसूनही स्पर्धेत चूरस निर्माण झाली आहे.

ग्रँडस्लॅम स्पर्धांचं वेळापत्रक हे अतिशय काटेकोर असत. जून महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंच ओपन पुरुष एकेरीची तर जुलै महिन्याच्या पहिल्या रविवारी विम्बल्डन स्पर्धेची पुरुष एकेरीची अंतिम फेरी खेळवली जाते.

या वर्षीच्या फ्रेंच ओपनची १० जूनला महिला ऐकेरी तर अकरा जूनला पुरूष ऐकेरीचा अंतिम फेरी “स्टेड रोलंड गर्रोस” या मैदानावर रंगणार आहे. २०१७ च्या फ्रेंच ओपनला नवा चॅम्पियन मिळेल का जुनेच आपला गड राखतील हे पाहणे औत्सुख्याचे ठरणार आहे.