हा भारतीय क्रिकेटपटू करत होता आत्महत्येचा विचार

सध्या भारतीय गोलंदाजांमध्ये सार्वधिक चर्चा असलेला कुलदीप यादव एकवेळ आत्महत्या करण्याचा विचार करत होता. उत्तर प्रदेश अंडर-१५ च्या संघात १३ वर्षांचा असताना निवड न झाल्यामुळे तो तेव्हा अतिशय निराश झाला होता. 

वनडेत भारताकडून हॅट्रिक विकेट्स घेणारा केवळ तिसरा गोलंदाज असणारा कुलदीप यादवने मार्च महिन्यात धरमशाला कसोटीत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर ह्या खेळाडूने मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे. 

कुलदीप यादव म्हणतो, ” मी उत्तर प्रदेश अंडर १५ संघात निवड व्हावी म्हणून खूप कष्ट घेतले होते. परंतु मला जेव्हा समजले की मला संघात स्थान देण्यात आले नाही, तेव्हा मी निराश झालो. मला या निराशेच्या भारत आत्महत्या करण्याचा विचार मनात आला.  वाईट काळात किंवा आवेगात असे विचार अनेकांच्या मनात येतात. ” 

हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना हा खेळाडू पुढे म्हणाला, ” मला कायम वेगवान गोलंदाज बनायचे होते. परंतु माझ्या प्रशिक्षकांनी मला फिरकी गोलंदाजी करायला सांगितले. जेव्हा मी थोडे चायनामन बॉल फेकले तेव्हा त्यांनी मला याची सवय करायला लावली. नाहीतर मी आज एक वेगळा गोलंदाज दिसलो असतो. ” 

आपल्या क्रिकेटमधील कारकिर्दीची श्रेय तो आपल्या वडिलांना देतो. ” मी एक हुशार विद्यार्थी होतो. मी क्रिकेट एक छंद म्हणून खेळत असे. परंतु वडिलांनीच मला यात कारकीर्द घडवायला सांगितले. ” असे कुलदीपने सांगितले.

कुलदीप यादवचा श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने मार्च महिन्यापासून २ कसोटी, १२ वनडे आणि ५ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने एकूण ३४ विकेट्स घेतल्या आहेत.