एफएसएआय लाईफ मॅरेथॉन 3 मार्च रोजी रंगणार

पुणे। जीवन, सुरक्षा आणि मदत कार्य या क्षेत्रात गेल्या 19 वर्षांपासून अथकपणे कार्यरत असलेल्या फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया( एफएसएआय) या संस्थेच्या वतीने पुणे फायर ब्रिगेड यांच्या सहकार्याने जीवन सुरक्षा क्षेत्रात जनजागृती करण्यासाठी “रन फॉर सुरक्षित भारत” या महत्वकांक्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी प्रशांत रणपिसे, एफएसएआय पुणे विभागाचे अध्यक्ष आर्किटेक्ट ऋषिकेश कुलकर्णी आणि एफएसएआय लाईफ मॅरेथॉनचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश गव्हाणे यांनी सांगितले कि, पुण्यातील या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून संपूर्ण देशभरातून 5000हुन अधिक धावपटूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.

2017 व 2018 मधील एफएसएआय लाईफ मॅरेथॉन स्पर्धेत देशभरातील 3000हुन अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता व त्यात देशभरातील 200 हुन अधिक अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश होता. या स्पर्धेमुळे जीवन, सुरक्षा व सम्बंधित उपाययोजना या संदर्भात जनजागृती करण्यात यश मिळाले आहे. यावेळी एफएसएआय लाईफ मॅरेथॉन समन्वयक भूषण पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

एफएसएआय लाईफ मॅरेथॉनचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश गव्हाणे म्हणाले की, येत्या 3 मार्च रोजी होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे करण्यात आले असून जीवन, सुरक्षा व उपाययोजना या संबंधी जनजागृती करण्यासाठी “रन फॉर सुरक्षित भारत” हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. या स्पर्धेला शासकीय स्तरावरून तसेच विविध कॉर्पोरेट कंपन्यांकडून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पाठिंबा लाभला आहे.

देशांतील प्रत्येक नागरिकांपर्यंत जीवन सुरक्षा संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी या स्पर्धेत अधिकाधिक नागरिकांनी भाग घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच, अधिकाधिक सहभाग धावपटूंना सहभागी होण्यासाठी 3 किलोमीटर अंतराच्या हौशी गटापासून ते 21 किलोमीटरच्या व्यावसायिक गटापर्यंत अशा विविध गटांमध्ये हि स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटातील विजेत्याला एफएसएआयच्या वतीने अग्निशमन उपकरणे पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेसाठी भारताचे आर्यमॅन व महासंचालक कृष्णा प्रकाश यांची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियक्ती करण्यात आली असून पुणे महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी प्रशांत रणपिसे यांची फायर अँड सेफ्टी अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या स्पर्धेला आणि स्पर्धेमागील जीवसुरक्षा व उपाययोजना या संकल्पनेला पुणे मनपा आयुक्त, एमआयडीसी, महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस, पुणे स्मार्ट सिटी, पुणे मेट्रो, फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र आणि पीसीएमसी अग्निशमन विभाग यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच, एफएसएआय लाईफ मॅरेथॉन स्पर्धेला महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन, एशरे, इशरे, इन्फ्रा, ओसम, मेपा, एनएफपीए, एफपीएआय, पीएचए, एएचएआर, इग्रोथ आणि सेफ अँड सेक्यूअर मॅगजीन या संस्थाचेही सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, याशिवाय नवक्षितिज, कामायनी, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह, वाय4डी, इ-लोकसेवा या एनजीओचे देखील सहकार्य लाभले आहे. यावर्षी या स्पर्धेत विशेष मुलांची देखील मॅरेथॉन आयोजित करण्यात आली यामध्ये नवक्षितिज व कामायनीमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, लवळे, पुणेचे विद्यार्थ्यांनी व तसेच, एआयएसएसएमएस आयओआयटी, अनंतराव पवार इंजिनिअरिंग कॉलेज अँड रिसर्च यांनी एफएसएआय लाईफ मॅरेथॉन स्पर्धेच्या प्रचार व प्रसारासाठी पुढाकार घेतला आहे. के रहेजा ग्रुप, लेहरी इंस्ट्रुमेंटेशन अँड वेल्वस प्रायव्हेट लिमिटेड, मंद डिझाईन यांचेदेखील प्रायोजकत्व लाभले आहे.

तसेच, महिलांच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी एफएसएआयच्या वतीने महिलांची सुरक्षा आणि सुरक्षितता यावर 2 मार्च रोजी एआयएसएसएमएस आयओआयटी कॉलेज कॅम्पस येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.