ओळख भारतीय क्रिकेट संघाच्या आजपर्यंतच्या प्रशिक्षकांची

आज रवी शास्त्रीची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली. त्यामुळे सहाजिकच गेले अनेक दिवस या पदावर कोण असणार याची चर्चा अखेर थंडावली.

भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपद हे कायमच क्रीडाविश्वात चर्चेचा विषय राहील आहे. अशा या भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकांचा गेल्या वीस वर्षातील हा आढावा

अजित वाडेकर (1992-1996)
भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर हे भारतीय क्रिकेट संघाचे पहिले पूर्णवेळ प्रशिक्षक होते. १९९२ ते १९९६ असा दीर्घकाळ ते भारतीय संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत. ते प्रशिक्षक असताना भारतीय कर्णधार म्हणून मोहम्मद अझरुद्दीनने जबाबदारी पार पडली होती.

संदीप पाटील (1996)
संदीप पाटील यांना प्रशिक्षक म्हणून अतिशय कमी काळ मिळाला. १९९६ सालीच त्यांना या पदावरून काढून टाकण्यात आले.

मदन लाल (1996-1997)
मदन लाल यांनी १९९६-९७ या काळात भारतीय प्रशिक्षक पद म्हणून जबाबदारी पार पाडली. ते १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते.

अंशुमन गायकवाड (1997-1999, 2000)
अंशुमन गायकवाड यांनी दोन वेळा भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी पार पाडली. १९९७-९९ आणि २००० अशा दोन काळात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली.

कपिल देव(1999-2000)
१९८३ सालच्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांनी १९९९-२००० या काळात त्यांनी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

जॉन राइट(2000-2005)
जॉन राइट हे भारतीय संघाचे पहिले परदेशी प्रशिक्षक ठरले. २०००-२००५ या काळात त्यांनी ही जबाबदारी पार पडली. एवढा मोठा काळ ही जबाबदारी पार पडणारे ते पहिले प्रशिक्षक होते. या काळात भारतीय संघ २००३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत गेला होता.

ग्रेग चॅप्पेल(2005-2007)
भारतीय क्रिकेट संघाचे आजपर्यंतचे सर्वात वादग्रस्त प्रशिक्षक म्हणून ग्रेग चॅप्पेल ओळखले जातात. २००५ ते २००७ या काळात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यावेळी भारतीय संघाचा सौरव गांगुली कर्णधार होता.

गॅरी कर्स्टन(2007-2011)
भारतीय संघाचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक म्हणून गॅरी कर्स्टन यांना ओळखले जाते. त्यांनी २००७ ते २०११ या काळात प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्या काळात भारतीय क्रिकेट संघाने ५० षटकांचा विश्वचषक २०११ साली जिंकला.

डंकन फ्लेचर(2011, 2011-2012)
२०११ आणि २०११-१२ या दोन काळात डंकन फ्लेचर यांनी भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या काळात भारतीय संघाला ८-० अशा पराभवाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सामोरे जावे लागेल.

रवी शास्त्री(2014-2016)
रवी शास्त्री यांनी भारतीय संघाचे डायरेक्टर आणि मॅनेजर अशा दुहेरी जबाबदाऱ्या २०१४-२०१६ या काळात पार पाडल्या. भारतीय संघाने त्यांच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये चांगली प्रगती केली.

अनिल कुंबळे(2016-2017)
ग्रेग चॅप्पेल यांच्याप्रमाणे अनिल कुंबळे यांचीही कारकीर्द वादग्रस्त ठरली. २०१६ ते २०१७ या काळात त्यांनी पूर्णवेळ ही जबाबदारी पार पाडली. त्यांच्या काळात भारतीय संघाने एकदिवसीय आणि कसोटी अशा दोनही प्रकारात चांगली कामगिरी केली होती. परंतु कर्णधार विराट कोहली बरोबर बिघडलेल्या संबंधांमुळे त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

रवी शास्त्री(2017-2019)
रवी शास्त्री यांची आज भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवड झाली असून ही निवड पुढील दोन वर्षांसाठी आहे.