पृथ्वी शॉच्या टीम इंडियामधील या खेळाडूंचे भविष्य उज्वल

१९ वर्षांखालील क्रिकेटने भारताला अनेक प्रतिभाशाली खेळाडू दिले आहेत. ज्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांचे नाव उज्ज्वल केले आहेत. सध्याच्या १९ वर्षांखालील भारतीय संघातही असे काही खेळाडू आहेत जे पुढे जाऊन वरिष्ठ भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करू शकतात.

त्यात कर्णधार पृथ्वी शॉ, शुभमन गिल, ईशान पोरेल, कमलेश नागकोटी, शिवम मावी असे काही खेळाडू आहेत. या सर्वांनीच न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात उत्तम कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. पृथ्वी आणि शुभमन यांनी उत्कृष्ट फलंदाजीचे तर नागरकोटी, शिवम आणि ईशान यांनी उत्तम वेगवान गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. उद्या या विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे.

त्यांच्या अशाच कामगिरीच्या जोरावर त्यांना वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळू शकते. याआधीही अनेक खेळाडूंना हि संधी मिळाली होती ज्याचे त्यांनी सोने केले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे विराट कोहली. २००८ सालचा १९ वर्षांखालील विश्वचषक भारतीय संघाने विराटच्या नेतृत्वाखाली जिंकला. या विजयाने विराटसाठी वरिष्ठ संघाचे दार खुले झाले.

त्यानेही निराश न करता त्याच्या कागिरीचा आलेख उंचावत ठेवला. सध्याच्या घडीला विराट सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्यांने पुढे जाऊन वरिष्ठ भारतीय संघाच्या नेतृत्वाचीही जबाबदारी खांद्यावर घेतली आहे.

विराट बरोबरच १९ वर्षांखालील क्रिकेटने भारताला युवराज सिंग, मोहम्मद कैफ, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, रवींद्र जडेजा, मनीष पांडे असे अनेक प्रतिभावान खेळाडू दिले. ज्यांनी क्रिकेट जगतात त्यांची वेगळी अशी ओळख बनवली. परंतु असेही काही खेळाडू होते जे १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये चमकले खरे पण त्यांना कामगिरीत सातत्य राखता न आल्याने पुढे त्यांना संधी मिळाली नाही.

२०१२ ला उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी उन्मुक्तच्या नावाची बरीच चर्चा झाली परंतु त्याच्या कामगिरीत सातत्य नसल्याने त्याला पुढे संधी मिळाली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्येही दिल्ली संघात उन्मुक्तची कामगिरी म्हणावी तशी झालेली नाही. तसेच आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठीही त्याला कोणत्याही फ्रॅन्चायझींची पसंती मिळाली नाही.

त्याचबरोबर रीतींदर सिंग सोधी, सौरभ तिवारी यांसारख्या १९ वर्षांखालील संघातून खेळलेल्या खेळाडूंना वरिष्ठ भारतीय संघात स्थान तर मिळाले होते, परंतु त्यांची कामगिरी ढासळल्याने पुढे त्यांना वगळण्यात आले.

त्यामुळे सध्याच्या १९ वर्षांखालील भारतीय संघातील खेळाडूंना पुढे जाऊन वरिष्ठ पातळीवर खेळण्याची संधी जरी मिळाली तरी त्यांना कामगिरीतही सातत्य ठेवावे लागणार आहे.