वेतन वाढीसाठी केलेल्या बंडाची किंमत स्मिथ, वॉर्नर मोजत नाही ना? गौतम गंभीरचा प्रश्न

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणानंतर क्रिकेट वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात दोषी आढळलेल्या खेळाडूंवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कारवाईही केली आहे.

यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षांची बंदी घातली असून सलामीवीर फलंदाज कॅमेरोन बॅनक्रोफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

या बंदीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना स्मिथला अश्रू अनावर झाले होते. तसेच स्मिथने कर्णधार म्हणून चेंडू छेडछाड प्रकरणाची सर्व जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे आता त्याच्याबद्दल अनेकांनी सहानुभूती दर्शवली आहे. यात भारताचा फलंदाज गौतम गंभीरनेही स्मिथची बाजू घेताना त्याला पाठिंबा दिला आहे.

गंभीरने या बद्दल ट्विट केले आहे. तसेच त्याने त्याच्या ट्विटमध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निर्णय खूप कठीण असल्याचेच म्हटले आहे. याबरोबरच त्याने मानधन वाढीसाठी बंद केल्यामुळे स्मिथ आणि वॉर्नरला अडकवलं जात नाही ना असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

गंभीरने ट्विट केले की, “क्रिकेट भ्रष्टाचार मुक्त होणे गरजेचे आहे पण ऑस्ट्रेलियाचा निर्णय कठीण आहे. वेतन वाढीसाठी बंड केले होते त्याची किंमत तर स्मिथ आणि वॉर्नर मोजत नाहीत ना? इतिहासातही असे प्रशासकही झाले ज्यांनी खेळाडूंसाठी उभे राहणाऱ्यांचा उपहास केला. उदारणार्थ: इयान चॅपल. “

यानंतरही गंभीरने आणखी दोन ट्विट केले आहेत. यातील एका ट्विटमध्ये त्याने स्मिथचा पत्रकार परिषदेमधील त्याच्या वडिलांबरोबरच फोटो शेयर केला आहे आणि म्हटले आहे की “स्मिथच्या वडिलांबद्दल आणि कुटुंबियांबद्दल वाईट वाटत आहे. आशा आहे की माध्यमे आणि ऑस्ट्रेलियन चाहते या सगळ्या गोष्टी थोड्या संयमाने घेतील. बंदी पेक्षाही फसवणूक करणारा म्हणून जगणे ही मोठी शिक्षा आहे.”

याचबरोबर पुढच्या ट्विटमध्ये गंभीर ने म्हटले आहे, “कदाचित मी भावनिक होत असेल पण मला स्मिथ फसवणारा दिसत नाही. मला तुमच्याबद्दल माहित नाही पण मला त्याच्यामध्ये असा कर्णधार दिसतो जो त्याच्या देशासाठी आणि संघासाठी कसोटी सामना जिंकून देण्याचा प्रयत्न करत होता. नक्कीच त्याच्या पद्धती संशयास्पद होत्या. पण लगेच त्याला चुकीचे ठरवू नका.”

कालही भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने स्मिथबद्दल सहानुभूतीचा ट्विट केला होता. ज्यात त्याने स्मिथबद्दल वाईट वाटले असल्याचे म्हटले होते.