बेंगळुरु घरच्या मैदानावर चेन्नईयीनकडून पराभूत

बेंगळुरू | हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीला घरच्या मैदानावर दुर्मिळ पराभव पत्करावा लागला. रविवारी चेन्नईयीन एफसीविरुद्ध बेंगळुरूचा 1-2 असा पराभव झाला. दोन मिनिटे बाकी असताना धनपाल गणेश याने केलेला गोल चेन्नईसाठी निर्णायक ठरला.

दक्षिणेतील या दोन संघांमधील डर्बी थरारक झाली. पूर्वार्धात पिछाडीवर पडलेल्या बेंगळुरूला उत्तरार्धात सुनील छेत्रीने बरोबरी साधून दिली होती. दुसऱ्या सत्रात सुरवातीलाच संधी दवडल्यानंतर पाच मिनिटे बाकी असताना छेत्रीने लक्ष्य साधले होते. त्यावेळी बरोबरीची चिन्हे दिसत होती, पण 88व्या मिनीटाला चेन्नईला फ्री-कीक मिळाली. त्यावर रेने मिहेलीच याने चेंडू नेटच्या दिशेने मारला.17 नंबरची जर्सी घातलेल्या गणेशने सहा फुट एक इंच उंचीचा फायदा घेत हेडींग केले आणि चेंडू नेटमध्ये मारला.

या निकालानंतर बेंगळुरूचे गुणतक्त्यातील दुसरे, तर चेन्नईचे तिसरे स्थान कायम राहिले. बेंगळुरूला सहा सामन्यांत दुसराच पराभव पत्करावा लागला, तर चेन्नईने तेवढ्याच सामन्यांत चौथा विजय मिळविला. बेंगळुरूचा गोलफरक 6 (14-8), तर चेन्नईचा 4 (11-7) आहे. त्यामुळे बेंगळुरूने दुसरे स्थान राखले. एफसी गोवा 12 गुणांसह आघाडीवर आहे. त्यांचा गोलफरक 8 (18-10) आहे. पहिल्या तिन्ही संघांचे प्रत्येकी 12 गुण असल्यामुळे लिगमधील चुरस कायम राहिली आहे.

चेन्नईने सुरवात आक्रमक केली. दुसऱ्याच मिनिटाला फ्रान्सिस्को फर्नांडीसने मुसंडी मारत बेंगळुरुच्या बचाव फळीवर दडपण आणले. सकारात्मक सुरवातीचे त्यांना लगेच फळ मिळाले. पाचव्या मिनिटाला बेंगळुरूच्या क्षेत्रात लेनी रॉड्रीग्जने चेंडू अडविला, पण तो सुनील छेत्रीच्या पायाला लागून उडाला तो थेट जेजेपाशी गेला. जेजेने दक्षपणे ताकदवान किक मारली. बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत सिंगच्या अंगाला लागून चेंडू नेटमध्ये गेला.

बेंगळुरूसाठी पहिला उल्लेखनीय प्रयत्न 18व्या मिनिटाला झाला. एदू गार्सियाने डाव्या बाजूला फटका मारला. त्यावेळी चेन्नईचा गोलरक्षक करणजीत सिंग नेटच्या डाव्या बाजूला झुकला होता. त्यामुळे गार्सियाने कोपऱ्यात फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू गोलपोस्टला लागला.

चेन्नईने बचाव भक्कम ठेवताना प्रतिआक्रमण रचण्याचे डावपेच लढविले. 39व्या मिनिटाला जेरी लालरीनझुला याने घेतलेल्या कॉर्नरवर जेजेचे हेडींग अचूक नव्हते. चेन्नईला रोखण्यासाठी बेंगळुरूने आक्रमक पवित्रा घेतला. यात एक प्रसंग उल्लेख करण्यासारखा होता. 29व्या मिनिटाला चेन्नईच्या मेल्सन आल्वेसने चेंडूवरील ताब्याच्या झुंजीत एदू गार्सियाला चकविले. त्यात गार्सिया पडला आणि त्याने फ्री-कीक मिळावी म्हणून पंचांकडे दाद मागण्यास सुरवात केली. यामुळे धक्का बसलेल्या मेल्सनने असे हावभाव केले की त्यावरून गार्सियाची अखिलाडूवृत्ती आपोआप उघड झाली.

21व्या मिनिटाला चेन्नईची पेनल्टीची मागणी फेटाळली गेली. रॅफेल आगुस्टो याने बेंगळुरुच्या क्षेत्रात चेंडू मारला. तो जेजेला मिळू नये म्हणून बेंगळुरूच्या हर्मनज्योत खाब्राने उडी घेतली. त्याचे कोपर जेजेला लागले. त्यावेळी चेन्नईच्या खेळाडूंनी पंचांच्या निर्णयाविषयी उघड नाराजी व्यक्त केली. 

खाब्राने बेंगळुरुचा किल्ला अबाधित राखण्यासाठी प्रसंगी दांडगाईचा खेळ केला. 13व्या मिनिटाला त्याने ज्यूड नौरुहला कोपर मारले. त्यामुळे त्याला सामन्यातील पहिले पिवळे कार्ड दाखविण्यात आले.

चेन्नईसमोर मुख्य आव्हान मिकूचे होते. गेल्या चार सामन्यांत त्याने किमान एक गोल केला होता. एकूण सहा गोल त्याच्या खात्यात होते, पण पुर्वार्धात त्याला चेंडूला स्पर्श करण्याची संधी क्वचितच मिळाली.

उत्तरार्धात बेंगळुरूचा प्रतिकार अपेक्षित होता. अपेक्षेनुसार तसेच घडले. उदांता सिंगने वेगवान धाव घेत मिकूला पास दिला, मिकूने सुनील छेत्रीकडे चेंडू सोपविला, पण छेत्रीने सोपी संधी दवडली. त्याने  स्थितीचा नीट अंदाज न घेता चेंडू मारला, त्यामुळे तो प्रतिस्पर्धी खेळाडूच्या पायाला लागून बॉक्सच्या बाहेर गेला. अशीच संधी राहुल भेकेने घालविली. गार्सियाने चेंडू मारल्यानंतर त्याने उडी घेत हेडींग केले, पण ते दिशाहीन होते. चेन्नईच्या आगुस्टोने नंतर दोन वेळा जोरदार प्रयत्न केले, पण बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतने दमदार बचाव केला.

निकाल
बेंगळुरु एफसी ः 1 (सुनील छेत्री 85) पराभूत विरुद्ध 
चेन्नईयीन एफसी ः 2 (जेजे लालपेखलुआ 5, धनपाल गणेश 88)