सत्तेचाळीस वर्षांपूर्वी गॅरी सोबर्समुळे एका तरुणाला मुंबईत मिळाली होती नोकरी…

तुम्ही म्हणाल गॅरी सोबर्समूळे एखाद्याला नोकरी कशी मिळाली असेल? ज्याला नोकरी मिळाली त्याच्याच लेखणीतून वाचा.

ही साधारण १९७१ मध्ये घडलेली घटना आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता. इकडे मुंबईत मी नोकरीच्या शोधात फिरत होतो. साला बीकॉम झालेलं असूनही अजून नोकरीचं कुठे जमत नव्हतं. तशातच कॅनरा बँकेची जाहिरात आली. कुठल्याही बँकेची जाहिरात आली की परीक्षेचा फॉर्म भरायचा या नियमानुसार मी फॉर्म भरला. लेखी परीक्षा पासही झालो. तोंडी परीक्षेसाठी बॅंकेकडून बोलावण्यात आले.

घरी खायची मारामार असलेल्या माझ्याकडे एकच शर्ट पँटची जोडी होती. तीच आदल्या दिवशी संध्याकाळी धुवून ठेवली. पहाटे लवकर उठून इस्त्री केली. रोजच्या शिरस्त्याप्रमाणे सकाळीच कर्नाक बंदराच्या नाक्यावर गेलो. रोज पेपर विकत घेऊन वाचण्याची माझी ऐपतच नव्हती. मग असाच कुणी पेपर वाचताना दिसला की मी त्यात डोकावत असे. त्या दिवशी पेपर वाचणारा अगदी शेवटच्या पानावर पोहोचला होता. तरीही मी सफाईने चार पाच शब्दांची एक बातमी वाचलीच.

मुलाखतीला उशीर नको म्हणून नाक्यावरून तसाच बँकेत गेलो. पोहोचताच शिपायाने बसायची खूण केली. केबिनमध्ये जाऊन शिपाई परत बाहेर आला आणि मला केबिनमध्ये जाण्याची खूण केली. मी दरवाजा ओढला, ढकललासुद्धा पण दरवाजा काही दाद देईना.दरवाज्यातच आपली विकेट जाते की काय असा विचार माझ्या मनाला शिवून गेला. तोच आतून एका भल्या माणसाने दरवाजा उघडला. मी केबिनमध्ये गेलो. तिथे बसलेल्या लोकांना ‘गुड मॉर्निंग किंवा नमस्कार’ असे काही म्हणावे इतकाही सभ्यपणा माझ्याकडे नव्हता. कुणी कधी शिकवलंच नाही ना.

मुलाखत सुरु झाली. मुलाखत घेणारे तीन जण एकामागोमाग प्रश्न विचारत होते. कुणी काय विचारायचे ठरलेले असावे. गावाकडून आल्याने हिंदी आणि इंग्रजीची तशी बोंबच होती. तरीही मी किल्ला लढवित राहिलो. मुलाखत घेणारांनी एकमेकांत “संपवू आता.” असा संकेत केला असावा तेवढ्यात एकाने अजून एक प्रश्न विचारला,

“हू इज गॅरी सोबर्स?”

माझ्या गावकुसात सोडा, अख्ख्या पंचक्रोशीत कुणाला त्या काळात क्रिकेटचा ‘क’ देखील माहित नव्हता. त्यामुळे मला गॅरी सोबर्स कोण आहे याची माहिती असणे शक्यच नव्हते. पण नाही. मी झाकीत उत्तर दिले,

“दि बेस्ट वेस्ट इंडियन क्रिकेट प्लेयर.”

प्रश्न विचारणाराच्या ओठांवर हसू आल्याचे मला जाणवले. त्यानेच मला मुलाखत संपल्याचे सांगत बाहेर जाण्याची खूण केली.

दोन तीन दिवसांनी घरी नेमणुकीचे पत्रच आले. पगार होता ३६७ रुपये!

शेवटी काय तर गॅरी सोबर्स मला पावला होता. तो खरोखर किती महान खेळाडू होता हे मी नंतर आवर्जून माहित करून घेतले. अवघ्या क्रिकेटविश्वात हा धुरंधर खेळाडू भरून वर दशांगुळे उरला होता. त्या दिवशी तर त्याने माझ्या रोजीरोटीसाठी सुद्धा हातभार लावला.

– गोपाळ बाळू गुंड

वाचा- 

वाढदिवस विशेष- गॅरी सोबर्सबद्दल कधीही न ऐकलेल्या ५ गोष्टी

बरोबर ५० वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार

एकाच जागी, एकाच ओव्हरमध्ये ६ षटकार मारणारा १९ वर्षीय युवराज सिंग, पहा व्हिडीओ…

विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयरला एवढं महत्त्व का?