भारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक?

भारतीय पुरुष संघाच्या 2011 विश्वचषक विजयात मोलाचा वाटा उचलणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठीही अर्ज दाखल केला आहे, असे वृत्त आहे.

51 वर्षीय कर्स्टन यांनी 2008 ते 2011 दरम्यान भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला होता. तसेच 2011 चा विश्वचषकही जिंकला.

त्यानंतर त्यांनी 2011 ते 2013 पर्यंत दक्षिण आफ्रिकेचेही प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्याचबरोबर ते सध्या आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी कर्स्टन यांच्या बरोबरच मनोज प्रभाकर, हर्षल गिब्स, दीमित्री मास्करेनहास यांनीही अर्ज केले असल्याचे वृत्त आहे.

बीसीसीआयने मंगळवारी जाहीर केले आहे की भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अंतिम निवड झालेल्या अर्जदारांची मुलाखत मुंबईमध्ये 20 डिसेंबरला पार पडेल. या मुलाखती कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांथा रंगस्वामी यांचा समावेश असणारी समीती घेईल.

रमेश पोवार यांचा महिला संघाच्या प्रशिक्षक पदाचा कालावधी मागील महिन्यात संपुष्टात आला आहे. त्यामुळे बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले होते. या पदासाठी पोवार यांनीही भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज दाखल केला आहे.

तसेच मागील महिन्यात मिताली राज आणि रमेश पोवार हा वाद चर्चेत होता. विंडिजमध्ये पार पडलेल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात 11 जणींच्या भारतीय संघातून मितालीला वगळण्यात आले होते. त्यानंतर तिने पोवार यांच्यावर अपमानास्पद वागणूकीचा आणि भेदभाव करण्याचा आरोप केला आहे.

पण टी20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्म्रीती मानधनाने पोवार यांना पाठींबा देताना त्यांची पुन्हा प्रशिक्षकपदावर नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

जेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय?

विराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना

मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी

लग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला