पुण्यातील गहुंजेच्या मैदानावर गौतम गंभीरचा मोठा विक्रम!

पुणे। रणजी ट्रॉफीत दिल्ली विरुद्ध बंगाल संघातील उपांत्य सामन्यात दिल्लीकडून खेळताना गौतम गंभीरने रणजी ट्रॉफीत ६००० धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. या सामन्यात गंभीरने शतक झळकावले आहे.

दिल्लीकडून रणजी ट्रॉफीत ६००० धावा पूर्ण करणारा गंभीर चौथा फलंदाज आहे. या आधी दिल्लीकडून मिथुन मन्हास (७९११ धावा),अजय शर्मा (७४२१ धावा) आणि रमण लांबा (६३४६ धावा) यांनी ६००० धावांचा टप्पा पार केला आहे.

आज गंभीरने बंगाल विरुद्ध १६२ चेंडूत ११६ धावा केल्या आहेत. त्याच्या बरोबरच सलामीला खेळणारा कुणाल चंदेलानेही शतक केले आहे. त्याने १६९ चेंडूत १०६ धावा केल्या. हे दोघेही नाबाद खेळत आहेत.

गंभीरने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९३ सामन्यात ४९.१९ च्या सरासरीने १४,७०९ धावा केल्या आहेत. यात त्याने ४१ शतके आणि ६७ अर्धशतके केली आहेत.