गौतम गंभीरची ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीवर कठोर शब्दात टीका

भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने 2012 च्या सीबी मालिकेत त्यावेळेचा भारताचा कर्णधार एमएस धोनीने घेतलेल्या निर्णयांवर टीका केली आहे. ही वनडे मालिका भारत, श्रीलंका आणि आॅस्ट्रेलिया संघात आॅस्ट्रेलियामध्ये झाली होती.

भारतीय संघासाठी 2012 चा आॅस्ट्रेलिया दौरा अत्यंत खराब गेला होता. याच दौऱ्यात आॅस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत 4-0 असा व्हाइटवॉश भारताला स्विकारावा लागला होता. या मालिकेनंतर ही तिरंगी वनडे मालिका पार पडली होती. या मालिकेतही भारताला यश मिळाले नव्हते.

त्यावेळी भारतीय संघात गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर असे तीन सलामीवीर होते. त्यामुळे धोनीने दोन सलामीवीरांनाच संघात संधी देण्याचे ठरवले, कारण 2015 मध्ये आॅस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकासाठी त्याला युवा खेळाडूंना संधी द्यायची होती. पण हा निर्णय गंभीरला पटला नव्हता.

याबद्दल इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला गंभीर म्हणाला, “2012 मध्ये आॅस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेत धोनीने घोषित केले की आम्ही तिघे एकावेळी खेळू शकत नाही. कारण तो 2015 च्या विश्वचषकाचा विचार करत होता. हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. मला वाटते कोणत्याही क्रिकेटपटूसाठी हा मोठा धक्काच असेल.”

“मी 2012 मध्ये कोणकडूनही ऐकले नव्हते की आम्ही 2015 च्या विश्वचषकाचा भाग नसणार आहोत. कारण माझ्यावर नेहमीच असा प्रभाव होता की जर तूम्ही धावा करत राहिला तर वय हा फक्त आकडा असतो.”

“आम्हाला विजयाची खूप गरज होती. माझ्या लक्षात आहे होबार्टमध्ये सेहवाग आणि सचिनने सलामीला फलंदाजी केली होती आणि मी तिसऱ्या क्रमांकावर, तर विराटने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. भारताने तो सामना जिंकला होता, तेही 37 षटकात धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत.”

“या मालिकेच्या सुरुवातीला आम्ही तिघे एकाच वेळी संघाच खेळलो नव्हतो. त्यावेळी रोटेशन पद्धत होती. पण जेव्हा गरज होती, तेव्हा धोनीने आम्हाला तिघांनाही खेळवायला हवे होते. जर तूम्ही निर्णय घेतला आहे तर तूमच्या निर्णयावर ठाम रहा. तूम्ही जे आधीच ठरवले आहे, त्याला पाठिंबा देऊ नका.”

भारताला त्या मालिकेत अंतिम सामन्यातही स्थान मिळवता आले नव्हते, त्यावेळी अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाने श्रीलंकेला पराभूत करत विजेतेपद मिळवले होते. पण त्याआधी होबार्ट येथे झालेला भारताचा श्रीलंकेविरुद्धचा सामना करो या मरोचा होता.

त्या सामन्यात भारताला 40 षटकांच्या आत श्रीलंकेने दिलेले आव्हान पार करायचे होते. त्यावेळी भारताने 37 षटकात 321 धावांचे आव्हान पार केले होते. त्यावेळी भारतीय संघात सचिन, सेहवाग आणि गंभीर या तिघांनाही संधी देण्यात आली होती. पण त्याआधीच्या काही सामन्यात गंभीरला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे गंभीरने ही टीका केली आहे.

तसेच या सामन्यानंतर श्रीलंका विरुद्ध आॅस्ट्रेलिया संघात झालेल्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: पहिल्या कसोटीत विजयासाठी भारताला ६ विकेट्सची तर आॅस्ट्रेलियाला २१९ धावांची गरज

असा भीमपराक्रम करणारा विराट कोहली जगातील पहिलाच क्रिकेटपटू

या कारणामुळे आॅस्ट्रेलियन संघाने आज हाताला बांधली काळी पट्टी

हा आॅस्ट्रेलियन गोलंदाज पडतोय भारतीय फलंदाजांना भारी