म्हणून गौतम गंभीरने केले वासिम जाफरचे जोरदार कौतुक

भारतीय फलंदाज गौतम गंभीरने आज अनुभवी फलंदाज वासिम जाफरचे ट्विटरवरून कौतुक केले आहे. यावर्षी जाफरने विदर्भाकडून रणजी खेळताना कोणतीही फी न घेण्याचा निर्णय घेतला होता, या निर्णयाबद्दलच गौतमने जाफरबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.

गौतमने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “वासिम तुझ्या फी न घेण्याच्या निर्णयाचा अभिमान वाटतो. सध्या भारतीय क्रिकेटपटू लोभ, लबाडी अशा गोष्टींसाठी ओळखली जातात. अशावेळी तू एक खरा आदर्श आहेस हे सिद्ध केले आहे.” या ट्विटबरोबरच गौतमने हिंदुस्थान टाइम्स वृत्तपत्रात आलेली याबद्दलची बातमीचा फोटो पोस्ट केला आहे.

जाफरने विदर्भ क्रिकेट असोसिएशन बरोबर मागच्या वर्षीच्या मोसमासाठी करार केला होता, परंतु त्याला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. तरीही विदर्भ क्रिकेटने त्याच्याबद्दल पूर्ण आदर ठेवला होता. याबद्दलच कृतज्ञता म्हणून जाफरने यावर्षीच्या मोसमासाठी कोणतीही फी न घेता विदर्भाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता.

यावर्षी विदर्भ संघाने रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले आहे. हे जाफरचे नववे रणजी विजेतेपद होते. त्याने याआधी ८ वेळा मुंबईकडून खेळताना रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते.

याबरोबरच जाफर यावर्षी रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, इराणी कप आणि विजय हजारे या चार देशांतर्गत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.