आज गौतम गंभीरसह या चार खेळाडूंचा झाला पद्म पुरस्काराने सन्मान

दिल्ली। आज(16 मार्च) भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरसह अन्य चार भारतीय खेळाडूंना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यामध्ये माजी क्रिकेटपटू गंभीर, फुटबॉलपटू सुनील छेत्री,  तिरंदाज बोम्बाल्या देवी लैशराम आणि बास्केटबॉलपटू प्रशांती सिंग यांचा देशाचा चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.

तसेच पर्वतारोहक बछेंद्री पाल यांना पद्मभुषण पुरस्काराने गौरविण्यात आले. बछेंद्री पाल ही जगातील सर्वात उंच शिखर, माउंट एवरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला आहे.

भारतीय क्रिकेटपटू गंभीरने मागील वर्षी डिसेंबरमध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत भारताच्या 2007 टी20 विश्वचषक आणि 2011 च्या वनडे विश्वचषक विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

त्याचबरोबर छेत्री हा भारताचा सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू असून तो सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूंमध्येही सर्वाधिक गोल करण्यामध्ये पहिल्या तीन खेळाडूंमध्ये आहे.

पद्म पुरस्कार हा कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक बाबी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकीय, साहित्य आणि शिक्षण, खेळ आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जातो.

यावर्षी भारत सरकारने एकूण 112 लोकांना पद्म पुरस्काराने गौरविले आहे. ज्यामध्ये 4 पद्मविभूषण, 14 पद्मभूषण आणि 94 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यातील 56 पुरस्कार 11 मार्चला देण्यात आले होते. या पुरस्कार वितरणाचे दुसरे सत्र आज पार पडले.

11 मार्चला झालेल्या पहिल्या सत्रात बुद्धीबळपटू द्रोणावल्ली हरिका, टेबल टेनिसपटू शरत कमल, कुस्तीपटू बजरंग पुनीया आणि कबड्डीपटू अजय ठाकूर या खेळाडूंना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

हा पुरस्कार स्विकारल्यानंतर या खेळाडूंनी सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या खेळाडूंचा झाला 2019 पद्म पुरस्कारांनी गौरव – 

बछेंद्री पाल – पर्वतारोहण(पद्मभूषण)

पद्मश्री – 

गौतम गंभीर – क्रिकेट

द्रोणावल्ली हरिका – बुद्धीबळ

शरत कमल – टेबल टेनिस

बोम्बाल्या देवी लैशराम – तिरंदाजी

प्रशांती सिंग – बास्केटबॉल

अजय ठाकूर – कबड्डी

बजरंग पुनीया – कुस्ती

महत्त्वाच्या बातम्या-

कोलकाता नाईट रायडर्सचे दोन महत्त्वाचे खेळाडू संघातून बाहेर

विश्वचषक २०१९मध्ये तो खेळाडू १००% खेळणार, कोहलीने अप्रत्यक्षपणे केले स्पष्ट

विश्वचषकात खेळणाऱ्या त्या ११ खेळाडूंबद्दल कोहलीचा मुद्दा गंभीरने खोडून काढला