फ्रान्सच्या जाईल्स सिमोनने जिंकली महाराष्ट्र ओपन

पुणे । प्रतिष्ठेच्या पहिल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत फ्रान्सच्या जाईल्स सिमोनने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा ७-६, असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद जिंकले. ही स्पर्धा पुण्यातील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी येथे झाली.

यावेळी ५ हजाराहून अधिक टेनिसप्रेमींनी प्रत्यक्ष स्टेडियममध्ये हजेरी लावून सामन्याचा आनंद लुटला. या सामन्यानंतर लगेचच एकेरीच्या विजेत्या सिमोनचा दुहेरीचा सामना याच ठिकाणी होणार आहे.

असा रंगला पहिला सेट
फ्रान्सच्या जाईल्स सिमोनने पहिल्या सेटमध्ये चांगला खेळ करत सेट ट्रायब्रेकरमध्ये ७-६ (७-४) असा जिंकला. दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला आपल्या सर्व्हिस राखल्या. परंतु ८व्या गेमला सिमोनने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनची सर्व्हिस भेदत आघाडी ५-३ अशी केली. पुढच्याच गेमला अँडरसनने चोख प्रतित्तोर देत सिमोनची सर्व्हिस भेदत ५-५ अशी बरोबरी केली. शेवटी ट्रायब्रेकरमध्ये गेलेला सेट सिमोनने ७-६ (७-४) असा जिंकला.

असा रंगला दुसरा सेट
पहिल्या सेटप्रमाणेच दोन्ही खेळाडूंनी आपली सर्व्हिस सुरुवातीला राखली. सेट ३-२ असा असताना सिमोनने दुसऱ्या सेटमध्ये पहिल्यांदाच अँडरसनची सर्व्हिस भेदत आघाडी ४-२ अशी केली. पुन्हा आपली सर्व्हिस राखत ५-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा अँडरसनची सर्व्हिस भेदत ६-३ असा सेट जिंकला आणि विजेतेपद जिंकले.