ब्लाॅग- गिरीश, पुढील महिन्यात तुझ्या नावापुढे “आशियाई गेम्स गोल्ड मेडलिस्ट” लागावं

-अनिल भोईर

दुबई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात इराणचा पराभव करून विजेतेपद पटकावले. कबड्डीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने अजून एकही स्पर्धा हारली नाही. प्रत्येक स्पर्धेत भारतीय संघ बलाढ्य असतो. भारतीय संघात जागा मिळवणे हिचं खरी खेळाडूंमध्ये स्पर्धा असते.

६५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा महाराष्ट्राने जिंकली. तेव्हा भारतीय संघात महाराष्ट्राच्या रिशांक देवडिगा व गिरीश इरनक या दोन खेळाडूंना संधी मिळाली. दोन्ही खेळाडूंची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती.

गिरीश इरनक महाराष्ट्राचा एक उत्कृष्ट बाचावपटू आहे. गिरीशला आपण बहुतेक वेळा लेफ्ट कव्हरला खेळताना बघितलं आहे, त्याचप्रमाणे तो लेफ्ट कॉर्नरला पण खेळतो. पण भारतीय संघात याजागी अनुभवी मनजीत चिल्लर व सुरेंद्र नाडा सारखे तगडे आणि मोठे खेळाडू खेळत असताना गिरीश इरनकला खेळायला मिळणार का असा प्रश्न होता.

कबड्डी मास्टर्सच्या पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात गिरीशला पहिल्या सातमध्ये तर सोडाच पण संपूर्ण सामन्यात खेळायला संधी नाही मिळाली. दुसऱ्या सामन्यात गिरीश व रिशांक दोघांनाही पहिल्या सातमध्ये स्थान मिळाले. केनिया विरुद्धच्या या सामन्यात गिरीश लेफ्ट कव्हरला खेळला, आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात ४ पकडी करून चांगली सुरुवात केली.

तिसऱ्या सामन्यात गिरीशला पुन्हा संघात स्थान मिळाले. या सामन्यात त्याला सुरेंद्र नाडाच्या जागी म्हणजे लेफ्ट कॉर्नर खेळायला संधी मिळाली. गिरिशने लेफ्ट कॉर्नरला खेळताना जबरदस्त पकडी करून पाकिस्तानी खेळाडूंना पाच वेळा आपल्या जाळ्यात अडकवले. या सामन्यात पाच ही पकडी यशस्वी करून कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारताकडून हाय फाय करणारा पहिला खेळाडू ठरला.

साखळीतील तीन सामने जिंकून भारताने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता त्यामुळे शेवटच्या साखळी सामन्यात संघात इतर खेळाडूंना संधी दिली. दक्षिण कोरिया विरुद्ध उपांत्य सामन्यात कर्णधार अजय ठाकूरने गिरीशवर विश्वास दाखवत पुन्हा एक संधी दिली. यासामन्यात गिरीशने जो आक्रमक खेळ दाखवला तो कमालीचा होता. मध्यरेषे जवळ जंग कु लीची केलेली पकड सर्वातम व निर्णायक ठरली. कबड्डी मास्टर्स स्पर्धेत एकाच सामन्यात सर्वाधिक सात पकडी करण्याचा विक्रम गिरिशने केला.

गिरीशच्या अफलातून कामगिरीने अनुभवी सुरेंद्र नाडाला संघाबाहेर बसावं लागलं. अंतिम सामन्यातही गिरीशने तीन पकडी केल्या. भारतीय संघाच्या विजयात गिरीश इरनकची भूमिका महत्त्वाची होती. येणाऱ्या पुढील स्पर्धांमध्ये भारतीय संघात सुरेंद्र नाडाची जागा हा खेळाडू चालवणार यात काही शंका नाही. दुबई मास्टर्स स्पर्धेत गिरीशने एकूण ५ सामने खेळले. त्यामध्ये त्याने सर्वाधिक १९ पकडी केल्या. दोन सामन्यांमध्ये हाय फाय करण्याचा विक्रमही गिरीशने केला. अश्याप्रकारे गिरीशने दुबई गाजवली.

खरंच जिंकलास भावा…
सोमवारी २ जुलैला भारतीय संघ मायदेशी परतला. देशभरात भारतीय संघाचं कौतुक व स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचा खेळाडू गिरीश इरनकचेही कल्याण येथे स्थानिक संघ ओम कबड्डी संघ व कबड्डी चाहतांकडून जोरदार स्वागत व सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना गिरीश थोडा भावनिक झालेला दिसला. “आज मी या माणसांमुळे येथे पोहचलो आहे”, असे बोलून तू आपल्या यशाचा श्रेय प्रशांत दादाला दिलं. कबड्डी मास्टर्स स्पर्धेचं गोल्ड मेडल प्रशांत दादाच्या गळ्यात घालताना तुला अश्रू अनावर झाले. हा क्षण बघताना खरंच खूप भरून आलं. सोशल मीडियावरही विडिओ बघताना खूप खेळाडू भावूक झाले. पण त्या खेळाडूंसाठी तुझी कामगिरी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. या क्षणाने हजारो चाहत्यांची तू मन जिंकलीस.

पुढील महिन्यात होणाऱ्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी संघात तुझी पुन्हा निवड होणारच यात काही शंका नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत पण अशीच चांगली कामगिरी करून भारताला गोल्ड मेडल मिळवून दे हीच सदिच्छा. पुढील महिन्यात तुझ्या नावाआधी “आशियाई गेम्स गोल्ड मेडलिस्ट” लागेल यात महाराष्ट्रातील कोणत्याही कबड्डी चाहत्याच्या मनात कोणतीही शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

-क्रिकेटला मिळाला पहिला १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणार खेळाडू

-या कारणामुळे सचिन तेंडूलकर नाही ‘आयसीसी हॉल आॅफ फेम’मध्ये