ISL 2018: एटीकेवरील दणदणीत विजयासह गोव्याची चौथ्या स्थानावर झेप

गोवा | एफसी गोवा संघाने हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात गतविजेत्या एटीकेवर 5-1 असा दणदणीत विजय नोंदविला. याबरोबरच गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेत गोव्याने बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. नेहरू स्टेडीयमवरील घरच्या मैदानावर गोव्याने पूर्वार्धातच तीन गोलांचा धडाका लावत भक्कम पकड घेतली.

मॅन्युएल लँझारोटे याने दोन, तर सर्जीओ ज्यूस्ट, फेरॅन कोरोमीनास आणि मार्क सिफ्नेऑस यांनी प्रत्येकी एका गोलची भर घातली. गोव्याची स्पर्धेतील एकूण गोलांची संख्या 39 झाली. यात कोरोमीनास याने 16 गोलांचे योगदान दिले आहे. गोव्याचा गोलफरकही 11 (39-28) असा सरस झाला.

गोव्याने 17 सामन्यांत आठवा विजय मिळविला असून तीन बरोबरी व सहा पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 27 गुण झाले. जमशेदपूर एफसी (17 सामन्यांतून 26), केरळा ब्लास्टर्स (17 सामन्यांतून 25) यांना मागे टाकत गोव्याने सहा वरून दोन क्रमांक प्रगती करीत चौथा क्रमांक गाठला. बेंगळुरू एफसी (37), एफसी पुणे सिटी (29) आणि चेन्नईयीन एफसी (29) या तीन संघांनी बाद फेरीतील प्रवेश यापूर्वीच नक्की केला आहे.

येत्या रविवारी (4 मार्च) जमशेदपूर आणि गोवा यांच्यात जमशेदपूरला लढत होईल. त्यातील विजयी संघाची आगेकूच नक्की असेल. एटीकेची शोकांतिका कायम राहिली. 17 सामन्यांत त्यांना दहावा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व चार बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 13 गुण आणि शेवटून दुसरे म्हणजे नववे स्थान कायम राहिले.

दहाव्याच मिनिटाला गोव्याने खाते उघडले. कॉर्नरवर ह्युगो बौमौसने हवेतून भिरभिरत चेंडू मारला. त्यावर सर्जिओने अचूक हेडींग केले. एटीकेचा गोलरक्षक सोराम पोईरेई चकला.

गोव्याचा दुसरा गोल पाच मिनिटांत झाला. डावीकडून मंदार राव देसाई याने चाल रचली. त्यानेच प्रयत्न करीत नेटच्या दिशेने वेगवान फटका मारला. सोरामने चेंडू थोपविला. त्यानंतर एटीकेच्या बचाव फळीने दक्षता दाखविण्याची गरज होती. प्रत्यक्षात त्यांनी ढिलाई दाखविली. त्यामुळे लँझारोटेला संधी मिळाली. त्याने चपळाईने पण शांतपणे चेंडू नेटमध्ये मारला.

सहा मिनिटांनी गोव्याने तिसरा गोल केला. प्रोणाय हल्दरने डावीकडून अफलातून चाल रचली. त्याने 40-50 यार्डावरून पलिकडील बाजूला लँझारोटेला पास दिला. लँझारोटेने चेंडूवर ताबा मिळवित पेनल्टी क्षेत्रात प्रवेश केला. मग सोरामला चकवित त्याने गोल नोंदविला.

उत्तरार्धात एटीकेच्या जॉर्डी माँटेल, रॉबी किन, रुपर्ट नाँगरुम, झीक्यूइन्हा, प्रोणय हल्दर व अन्वर अली यांना अखिलाडू आणि धसमुसळ्या खेळाबद्दल पिवळी कार्ड दाखविण्यात आली.

गोव्याने 64व्या मिनिटास चौथा गोल नोंदविला. हुकमी स्ट्रायकर कोरोमीनास याने खेळाडूंच्या भिंतीवरून (वॉल) सुंदर फटक्याच्या जोरावर नेटच्या उजव्या कोपऱ्यात चेंडू मारला. एटीकेला दिलासा देणारा गोल मार्की खेळाडू रॉबी किन याने तीन मिनिटे बाकी असताना नोंदविला. अंतिम टप्यात बदली खेळाडू मार्क सिफ्नेऑस याने गोव्याचा पाचवा गोल फटकावला.

निकाल |
एफसी गोवा |
5 (सर्जिओ ज्यूस्ट 10, मॅन्यूएल लँझारोटे 15′, 21, फेरॅन कोरोमीनास 64,
मार्क सिफ्नेऑस 90 ) विजयी विरुद्ध एटीके | 1 (रॉबी किन 87)