ISL 2017: नॉर्थईस्टने गोव्याला बरोबरीत रोखले

गोवा । हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात एफसी गोवा संघाविरुद्ध जिद्दीने खेळ करीत नॉर्थईस्ट युनायटेडने 2-2 अशी बरोबरी साधली. गोव्याला नेहरू स्टेडियमवर नवव्या स्थानावरील प्रतिस्पर्ध्याने बरोबरीत रोखणे सुमारे 17 हजार गोवेकर चाहत्यांसाठी निराशाजनक ठरले.

पुर्वार्धात मंदार राव देसाईने गोव्याचे खाते उघडले. त्यानंतर मार्सिनीयोने नॉर्थईस्टला बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात फेरॅन कोरोमीनासने गोव्याला आघाडी मिळवून दिली, पण बदली खेळाडू जॉन मॉस्क्युराने नॉर्थईस्टला बरोबरी साधून दिली.

गोव्याला 12 सामन्यांत दुसरीच बरोबरी पत्करावी लागली. सहा विजय व चार पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. 20 गुणांसह त्यांनी सरस गोलफरकामुळे केरळा ब्लास्टर्सला मागे टाकून पाचवे स्थान मिळविले. ब्लास्टर्सचे 14 सामन्यांतून 20 गुण आहेत. यात गोव्याचा 6 (29-23) असा गोलफरक ब्लास्टर्सच्या उणे 1 (17-18) गोलफरकापेक्षा सरस ठरला.

बेंगळुरू (27), चेन्नईयीन (23), पुणे (22), जमशेदपूर (22) अनुक्रमे पहिल्या चार क्रमांकांवर आहेत.
नॉर्थईस्ट 12 सामन्यांतून 11 गुणांसह नवव्या स्थानावर कायम राहिले. तीन विजय, दोन बरोबरी व सात पराभव अशी त्यांची कामगिरी आहे.

53व्या मिनिटाला गोव्याने परिपूर्ण फिनीशिंगच्या जोरावर आघाडी घेतली. अहमद जाहौहने डावीकडून दिलेला पास मॅन्युएल लँझारोटेकडे गेला. हे हेरत कोरोमीनासने नेटच्या दिशेने धाव घेतली आणि चेंडू मिळताच अचूक फटका मारला.

नॉर्थईस्टसाठी बदली खेळाडू उपयुक्त ठरला. 66व्या मिनिटाला मुख्य प्रशिक्षक अॅव्रम ग्रँट यांनी सेझारीयो याच्याऐवजी जॉन मॉस्क्युरा याला मैदानावर उतरविले. त्याने पाच मिनिटांत हा निर्णय सार्थ ठरविला. रॉलीन बोर्जेसने बॉक्समध्ये सैमीनलेन डुंगलला पास दिला. डुंगलने मॉस्क्युराकडे चेंडू मारला. त्यामुळे गोव्याचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याचा अंदाज चुकला. मग मॉस्क्युराने मोकळ्या नेटच्या वरच्या बाजूने चेंडू आत मारला.

78व्या मिनिटाला एदू बेदीयाने नेटच्या दिशेने चेंडू मारला. त्यावर ताबा मिळविण्यासाठी कोरोमीनास धावत होता, पण तोच रेहेनेश पुढे सरसावला. त्याला लागून चेंडू उडाला. तो पुन्हा मारण्यासाठी कोरोमीनास हालचाल करीत होता, त्याचवेळी त्याला सांबीनाने मागून पाय घालून पाडले. यानंतरही गोव्याला पेनल्टी किक देण्यात आली नाही.

पुर्वार्धात चुरशीच्या खेळानंतर अंतिम टप्यात गोल झाले. 42व्या मिनिटाला गोव्याच्या जोनाथन कार्डोझोने मारलेला चेंडू नॉर्थईस्टच्या मार्टिन डियाझच्या टाचेला लागून पुढे गेला. त्याचवेळी नेटच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मंदारने चपळाईने अचूक फटका मारत नॉर्थईस्टचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याला चकविले.

त्यानंतर तीन मिनिटांत नॉर्थईस्टने बरोबरी साधली. उजवीकडून रेगन सिंगने मारलेला चेंडू डॅनिलो लोपेस सेझारीयोच्या पायाला लागून नेटच्या पलिकडील बाजूला गेला. हालीचरण नर्झारीने चेंडूवर ताबा मिळवित मार्सिनीयोला पास दिला. मग मार्सिनीयोने उरलेले काम फत्ते केले.

निकाल ।
एफसी गोवा । 2 (मंदार राव देसाई 42, फेरॅन कोरोमीनास 53)
बरोबरी विरुद्ध नॉर्थईस्ट युनायटेड एफसी । 2
(मार्सिनीयो 45, जॉन मॉस्क्युरा 71)