गोलफादेवी मंडळ, दुर्गामाता स्पोर्ट्स, जय भारत मंडळ दुसऱ्या फेरीत दाखल

वंदे मातरम् क्रीडा मंडळाने आपल्या “अमृत महोत्सवी वर्षानिमित्त” आयोजित केलेल्या प्रथम श्रेणी स्थानिक गट कबड्डी स्पर्धेत गोलफादेवी, दुर्गामाता, जय भारत यांनी दुसऱ्या फेरीत धडक दिली. आहता प्रोडक्शन पुरस्कृत नायगाव-भोईवाडा येथील सदाकांत ढवण मैदानात सुरू असलेल्या पुरुष गटाच्या सामन्यात गोलफादेवी सेवा मंडळाने एच जी एस स्पोर्ट्सचा ३९-१९असा सहज पाडाव केला.

पूर्वार्धात १८-११अशी आघाडी घेणाऱ्या गोलफादेवीने उत्तरार्धात आणखी जोशपूर्ण खेळ करीत २०गुणांच्या मोठ्या फरकाने हा विजय मिळविला. अक्षय बिडू, साईल हरचकर यांच्या चढाई-पकडीच्या झंजावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. एच जी एसच्या ओंकार जाधव, तेजस गायकवाड यांनी पूर्वार्धात चांगली चमक दाखविली, पण उत्तरार्धात ते कमी पडले.

दुर्गामाता स्पोर्ट्सने चुरशीच्या लढतीत गुड मॉर्निग स्पोर्ट्सचा ३२-२८असा पाडाव केला. शशिकांत पाटील, प्रणय भादवणकर, सौरभ पाटील यांनी पूर्वार्धात चतुरस्त्र खेळ करीत विश्रांतीपर्यंत गुड मॉर्निंगला १६-११अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. पण ती त्यांना राखता आली नाही. उत्तरार्धात दुर्गामाताच्या प्रथमेश पालांडे, आशिष पाले, सौरभ चव्हाण यांनी जोरदार आक्रमण व भक्कम बचाव करीत संघाला ४गुणांनी विजय मिळवून दिला.

शेवटच्या सामन्यात जय भारत सेवा मंडळाने अमरहिंदला ३६-२०असे नमवित आगेकूच केली. जय भारतच्या विनायक व ओमकार या मोरे बंधूंने दोन्ही डावात चतुरस्त्र खेळ करीत हा विजय सोपा केला. अमरहिंदचा दिनेश बापार्डेकर बरा खेळला.