श्री सिद्धेश्वर मंडळ कुमार गट कबड्डी स्पर्धेत विकास,गोलफादेवी उपांत्यपूर्व फेरीत दाखल

विकास, गोलफादेवी, एस.एस.जी; विजय यांनी मनसे शाखा क्र.१९४पुरस्कृत , श्री सिद्धेश्वर सेवा मंडळ आयोजित “मनसे चषक” कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.प्रभादेवी- स्व.राजाभाऊ साळवी उद्यानातील स्व. किरण मुनणकर क्रीडांगणावर आज दुसऱ्या दिवशी झालेल्या पहिल्या सामन्यात प्रभादेवीच्या विकासाने लालबागच्या महाराष्ट्र स्पोर्ट्सचा ५०-१०असा धुव्वा उडवीत आगेकूच केली.

अवधूत शिंदे यांच्या धारदार चढाया त्याला सिद्धेश चव्हाणच्या भक्कम पकडीची मिळालेली साथ यामुळे पहिल्या डावात त्यांच्याकडे २०-०३अशी भक्कम आघाडी होती. तोच जोश कायम ठेवत त्यांनी हा विजय सोपा केला. महाराष्ट्र स्पोर्ट्सचा साहिल सुवरे बरा खेळला.

दुसऱ्या सामन्यात वरळी कोळीवाडयातील गोलफादेवीने ना. म.जोशी मार्गच्या जय भारतचे कडवे आव्हान ६३-४१असे संपुष्टात आणले. पहिली १०मिनिटे चुरशीनें खेळल्या गेलेल्या या सामन्यातील उर्वरित ३०मिनिटे मात्र गोलफादेवीने वर्चस्व राखले. मध्यांतराला ६३-४१ अशी आघाडी गोलफादेवीकडे होती.सिद्धेश पिंगळे,विष्णू लाड गोलफादेवीकडून, तर राज आचार्य, निखिल पाटिल जय भारतकडून उत्कृष्ट खेळले. एस.एस.जी.ने वीर संताजीचा प्रतिकार ५२-३७असा मोडून काढला. विश्रांतीपर्यंत २४-१२अशी आघाडी घेणाऱ्या एसएसजीला उत्तरार्धात मात्र वीर संताजीने कडवी लढत दिली. पण ती त्यांना विजय मिळवून देण्यात पुरेशी नव्हती.

शेवटच्या सामन्यात दादरच्या विजयने दादरच्या अमरला ३८-१७असे नमवित आगेकूच केली खरी, पण क्रीडारसिकांवर आपल्या खेळाने मोहिनी घातली ती अमरच्या छोट्या खेळाडूंनी.अमरचे सर्वच खेळाडू हे ८ते१४वर्षाच्या आतील होते. तसेच तब्बेतीने देखील किरकोळ होते. तरीपण त्यांचा खेळण्याचा बाज आणि धारिष्ट पाहून तारक राऊळसह अन्य उपस्थित माजी खेळाडू देखील अचंबित झाले.मध्यांतरापर्यंत अमरने विजयला कडवी लढत दिली. त्यावेळी गुणफलक २०-१४असा विजयच्या बाजूने होता.सूरज साळुंखे, अभिषेक रुपनर विजयकडून, तर साहिल कुडव, साहिल रीकामे अमरकडून उत्तम खेळले.