पहिल्या एक्सेल टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेस 23 एप्रिलपासून प्रारंभ

स्पर्धेत शहरांतून एकुण 8 महिला कॉर्पोरेट संघ सहभागी

पुणे । डिव्हाईन स्टार्स ग्रुप, पुणे यांच्या तर्फे आयोजित पहिल्या एक्सेल टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून यामध्ये शहरांतील एकुण 8 महिला कॉर्पोरेट संघ झुंजणार आहेत. ही स्पर्धा स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी, धायरी, पुणे येथे दि.23 एप्रिल 2018 पासून सुरु होणार आहे.

पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना एक्सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंटसचे संचालक संजय देसाई आणि संदीप चिंचबनकर यांनी सांगितले की, एक्सेलच्या वतीने सामाजिक लक्ष निश्चित केले जाते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षी ही स्पर्धा भारतीय सेनादलाला समर्पित करण्यात येत आहे. सिमेवर लढणार्‍या आणि शहीद होणार्‍या आमच्या शुर सैनिकांना ही स्पर्धा समर्पित केली आहे.

तसेच, स्पर्धेचे उद्घाटन या शुरसैनिकांच्या कुटूंबियांच्या हस्ते दि.23 एप्रिल 2018 रोजी करण्यात येणार असून याप्रसंगी सर्व संघ आणि प्रायोजकांच्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. स्पर्धेला एक्सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंटस, नेक्स्टजेन प्रोजेक्टस्‌, श्री रूरल एज्युकेशन ट्रस्ट, कॉवलेंट प्रोजेक्टस्‌, सना लॉजिस्टिक्स, श्री कम्प्युटर्स, पाटील असोसिएट्स अँड सन्मय यांचा पाठिंबा लाभला असून महाराष्ट्रातील शुरसैनिकांच्या कुटुंबांचा यांच्यावतीने सन्मान करण्यात येणार आहे. ही स्पर्धा अत्याधुनिक क्रिकेटच्या सोईसुविधा उपलब्ध असलेल्या धायरी येथील स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, डिस्टिलरी, शुगर अँड कोजनरेशन, बायोफ्युअल्स, झिरो लिक्वीड डिस्चार्ज सिस्टम्स आणि हरित उर्जा तंत्रज्ञान विकसित करणारी आघाडीची कंपनी असलेल्या पुणेस्थित एक्सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंटस यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत स्पर्धेत रिग्रीन, डिव्हाईन, आयएसजीईसी, ट्रँटर, गॅलक्सी, मेटा स्कुलिंग, शेलार ग्रुप आणि ईश्वरी हे 8 संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या व तृतीय क्रमांकाच्या संघांना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच, ही स्पर्धा लाल रंगाच्या चेंडूवर खेळविण्यात येणार असून याचे लाईव्ह व्हिडिओ स्ट्रिमींगदेखील करण्यात येणार आहे.