…तर विराटला सोडावं लागू शकतं कर्णधारपद !

जोहान्सबर्ग | भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू ग्रॅम स्मिथने जोरदार टीका केली आहे. तसेच विराटकडे भारतीय क्रिकेट बोर्डाकडे एक दीर्घकाळ कर्णधार म्हणून पाहावे का? यावरही त्याने प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

भारतात झालेल्या कसोटी मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत आलेल्या अपयशामुळे विराटवर जोरदार टीका होत आहे. त्यात विराटने यावर माघार न घेता जोरदार उत्तर दिले आहे. त्यामुळे हे वादळ आता शांत होण्याचे नाव घेत नाही.

त्यात आता जागतिक क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ नेतृत्व केले आहे त्या ग्रॅम स्मिथनेही उडी घेतली आहे.

“मला नक्की माहित नाही की भारतीय संघ विराटकडे एक दीर्घकाळ नेतृत्व करणारा कर्णधार म्हणून पाहत आहे की नाही? या संपूर्ण वर्षभरात तो भारताच्या बाहेर क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळे त्याला खडतर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. अशा काळात त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागेल. त्यामुळे तो किती काळ भारताचा कर्णधार राहील यात शंका आहे. ” असे स्मिथ म्हणाला आहे.

कोहलीला नवीन संकल्पना सुचवणाऱ्या आणि लीडरशीपसाठी मदत करणाऱ्या सहकाऱ्याची आवश्यकता आहे, अन्यथा कोहली जास्त दिवस कर्णधारपदावर राहणार नाही, असही स्मिथने पुढे म्हटलं आहे.

कोहलीच्या आक्रमकतेमुळे त्याचा खेळ बहरतोय, मात्र तो संघाचं नुकसान करतोय. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी इतर खेळाडूंना संघर्ष करावा लागतोय, असंही स्मिथनं म्हटलंय.

थोडं स्मिथ बद्दल…
स्मिथच्या या म्हणाल्याला खूप महत्त्व आहे. कारण १०० पेक्षा जास्त कसोटी सामन्यात देशाच नेतृत्व केलेला स्मिथ हा एकमेव खेळाडू आहे. त्याने तब्बल १०९ सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करताना ५३ सामन्यात संघाला विजय मिळवून देताना २९ पराभव पाहिले आहे तर २७ सामने अनिर्णित राहिले आहे. ५० कसोटी सामने कर्णधार म्हणून जिंकणारा स्मिथ हा जगातील एकमेव कर्णधार असून त्याने वयाच्या २२व्या वर्षांपासून ते ३३व्या वर्षापर्यंत आफ्रिकेचे नेतृत्व केले होते.