Video: एक हात मोडला असताना तो आला मैदानात, पुढे काय झाले पहाच!

काल दिल्लीकर क्रिकेटपटू उन्मुक्त चंद जबडा तुटला असताना फलंदाजीला आला. एवढेच नाही तर या २५ वर्षीय प्रतिभावान खेळाडूने शतकी खेळी केली. यामुळे कट्टर क्रिकेटप्रेमींना दोन घटनांची खास आठवण झाली.

एक म्हणजे जबडा तुटला असताना भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने गोलंदाजी करत ब्रायन लाराला बाद केलेला खास क्षण आणि दुसरा म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ हा २००९मध्ये सिडनी कसोटीत पहिल्या डावात एक हात मोडला असताना संघासाठी दुसऱ्या डावात आणि सामन्यातील चौथ्या डावात १०व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

हा कसोटी सामना कसोटीप्रेमी आजही विसरले नाहीत. याचे कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ग्रॅमी स्मिथने त्यावेळी संघहिताला दिलेले प्राधान्य.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या मालिकेत २-० अशी आफ्रिका आघाडीवर होती. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४४५धावांचा डोंगर उभा केला. स्मिथ दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात फलंदाजीला आला परंतु तो ३० धावांवर खेळत असताना मिचेल जॉन्सनचा तब्बल ताशी १४३ किलोमीटरने आलेला चेंडू स्मिथच्या हातावर लागला. त्यानंतर त्याने मैदान सोडले.

तो परतला असतानाही दक्षिण आफ्रिकेने एका बाजूने किल्ला चांगला लढवताना सर्वबाद ३२७ धावा केल्या. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आपला डाव ४ बाद २५७ धावांवर घोषित केला. आणि आफ्रिकेसमोर चौथ्या दिवशी ३७६ धावांचे लक्ष ठेवले.

दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या दिवशी हा सामना वाचवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला ८.२ षटके फलंदाजी करण्याची गरज होती. मैदानात ९व्या विकेटच्या रूपात एंटीनी आणि स्टेन खेळत होते. परंतु जेव्हा स्टेन बाद झाला तेव्हा सर्वांना वाटले की ऑस्ट्रेलिया जिंकली आहे आणि स्मिथ हात मोडल्यामुळे फलंदाजीला येणार नाही. परंतु असे झाले नाही आणि स्मिथ एखाद्या सेनापतीसारखा फलंदाजीला आला.

यावेळी त्याला मैदानावरील प्रेक्षकांनी उठून टाळ्यांच्या गजरात खास स्वागत केले. विशेष म्हणजे एक हात मोडला असतानाही स्मिथ तब्बल २६ चेंडू खेळला परंतु ऑस्टेलियाचा खडूस महान कर्णधार रिकी पॉन्टिंगने आपला तिखट मारा सुरूच ठेवला. जेव्हा सामना वाचवण्यासाठी ११ चेंडू खेळण्याची गरज होती तेव्हा तब्बल ताशी १४५ किलोमीटरने आलेल्या मिचेल जॉन्सनच्या चेंडूचा स्मिथला एका हाताने सामना करता आला नाही आणि त्याच्या यष्टीचा जॉन्सनच्या चेंडूने वेध घेतला.

त्यावेळचा ऑस्ट्रेलिया संघ हा फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी खेळत असे. त्यामुळे स्मिथ बाद झाल्यावर जॉन्सनसह सर्वच खेळाडूंनी मोठा जल्लोष केला परंतु पुन्हा भानावर आल्यावर त्यांनी स्मिथचे जाऊन कौतुक केले. त्यात ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पॉन्टिंग सर्वात पुढे होता.