14 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या वैष्णवी आडकर हिला दुहेरी मुकुट मुलांच्या गटात मध्यप्रदेशच्या आयुषमान अर्जेरीयाला विजेतेपद 

पाचगणी: रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईजरवाईन हॉटेल 14 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात पुण्याच्या वैष्णवी आडकर हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, मुलांच्या गटात ग्वाल्हेरच्या आयुषमान अर्जेरीया याने विजेतेपद पटकावले.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित वैष्णवी आडकर हिने आपली शहर सहकारी सातव्या मानांकित परी सिंगचा 6-0, 6-1असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

हा सामना 1तास 10चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये वैष्णवीने पहिल्या, तिसऱ्या गेममध्ये परीची सर्व्हिस भेदली व हा सेट  6-0 असा सहज जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येदेखील परीला सूर गवसलाच नाही.

वैष्णवीने  पहिल्याच गेममध्ये परीची सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये वैष्णवीने वर्चस्व कायम राखत पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा  6-1असा जिंकून विजेतेपद मिळवले.

वैष्णवी ही अभिनव विद्यालय इंग्लिश मिडीयम शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून बाऊंस टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. याआधी तिने नुकतेच बंगळुरू येथील  16 वर्षाखालील सुपर सिरीज स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.

दुहेरीत अंतिम फेरीत वैष्णवी आडकरने हर्षाली मांडवकरच्या साथीत कुंदना बंदारू व अमीशी शुक्ला यांचा 6-1, 6-2असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

14 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत चौथ्या मानांकित ग्वाल्हेरच्या आयुषमान अर्जेरीया याने अकराव्या मानांकित कर्नाटकाच्या रोनीन लोटलीकरचा टायब्रेकमध्ये 7-5, 7-6(8)असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

आयुषमान हा आयटीएम ग्लोबल स्कुलमध्ये नववी इयत्तेत शिकत असून ग्वाल्हेर संबल टेनिस असोसिएशन येथे सराव करतो.  दुहेरीत अंतिम फेरीत  अन्मय देवराजू व आयुष भट यांनी विशेष पटेल व अर्जुन गोहाड या जोडीचा 6-1, 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक जावेद सुनेसरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 

14 वर्षाखालील मुली: अंतिम फेरी: वैष्णवी आडकर(महा)(2)वि.वि.परी सिंग(महा)(7)6-0, 6-1;

14 वर्षाखालील मुले: अंतिम फेरी: आयुषमान अर्जेरीया(मध्यप्रदेश)(4)वि.वि.रोनीन लोटलीकर(कर्नाटक)(11)7-5, 7-6(8);

दुहेरी गट:  14 वर्षाखालील मुले:उपांत्य फेरी:  विशेष पटेल/अर्जुन गोहाड(1)वि.वि.अरुणवा मजुमदार/शिवम कदम 4-5सामना सोडून दिला;  अन्मय देवराजू/आयुष भट(2)वि.वि.रोनीन लोटलीकर/मोनील लोटलीकर(4)6-2, 3-6, 10-2;

अंतिम फेरी:  अन्मय देवराजू/आयुष भट(2)वि.वि.विशेष पटेल/अर्जुन गोहाड(1)6-1, 6-4;

14 वर्षाखालील मुली:  उपांत्य फेरी:   हर्षाली मांडवकर/वैष्णवी आडकर(1)वि.वि.सूर्यांशी तन्वर/मधुरिमा सावंत 6-3, 6-3; कुंदना बंदारू/अमीशी शुक्ला वि.वि.भूमिका त्रिपाठी/कशिश बोटे(4)6-3, 6-4;

अंतिम फेरी:  हर्षाली मांडवकर/वैष्णवी आडकर(1)वि.वि.कुंदना बंदारू/अमीशी शुक्ला 6-1, 6-2