तेलुगू टायटन्स विरुद्ध गुजरात संघाला विजयाची जास्त संधी

आज इंटर झोनल चॅलेंजर वीकमधील दुसऱ्या दिवशी गुजरात फॉरचूनजायन्टस आणि तेलुगू टायटन्स एकमेकांविरुद्ध भिडणार आहे. गुजरात संघाने घरच्या मैदानावरील सर्व सामने जिंकले आहेत तर विरोधी संघ तेलुगू टायटन्स घरच्या मैदानावर सलग ५ सामने हरला होता.

तेलुगू टायटन्स संघ सध्या खूपच बिकट परिस्थितीतून जात आहे. या संघाकडं राहुल चौधरी, राकेश कुमार, निलेश साळुंके यांच्या सारखे प्रभावी खेळाडू असून देखील हा संघ पराभवाच्या छायेतून बाहेर पडू शकत नाही आहे. या संघाने खेळलेल्या ८ सामन्यांपैकी ६ सामन्यात हार पत्करली आहे तर एक सामना जिंकला आहे. एक सामना बरोबरीत सोडवण्यात या संघाला यश मिळाले आहे. या मोसमाच्या उद्धघाटनाचा सामना या संघाने जिंकला होता. त्यानंतर हा संघ
सामना जिंकू शकला नाही. राहुल चौधरी,राकेश कुमार ,विशाल भारद्वाराज आणि निलेश साळुंके यांच्या कडून चांगल्या खेळाची अपेक्षा असणार आहे.

गुजरातचा संघ सध्या खूप चांगल्या लयीत आहे. या संघाची खरी ताकद डिफेन्स आहे. या संघासाठी राइट आणि लेफ्ट कॉर्नर खेळणारे दोन्ही इराणियन डिफेंडर फझल अत्राचली आणि अबोझर मिघानी खूप चांगला खेळ करत आहेत. सचिन आणि रोहित गुलिया हे रेडींगमध्ये संघासाठी गुण मिळवत आहेत. सचिन या मोसमात गुजरातला गवसलेला उत्तम रेडर आहे. सचिनने घरच्या मैदानावर झालेल्या सर्व सामन्यात उत्तम कामगिरी केली आहे. याचा फायदा गुजरातसंघाला होऊन गुजरात संघ सामने जिंकत आहे. रोहित गुलियाने यु मुंबा विरुद्ध उत्तम कामगिरी करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला होता.

महेंद्र राजपूत हा गुजरात संघाचा आणखी एक रेडर, जेव्हा संधी मिळते तेव्हा उत्तम कामगिरी करतो आहे. या संघाचा कर्णधार सुकेश हेगडेचा रेडींगमधील खराब फॉर्म ही फक्त या संघासाठी चिंतेची बाब आहे.

आजच्या सामन्यात गुजरात संघाला विजयाची जास्त संधी असणार आहे. कारण मागील सामन्याप्रमाणे जर या संघाने खेळ केला तर आजचा सामना देखील गुजरातचा संघ जिंकेल. राहुल आणि राकेश यांच्याकडून तेलुगू टायटन्सचे पाठीराखे चांगल्या खेळाची अपेक्षा तर करत आहेतच पण विजयाची देखील अपेक्षा करत आहेत.