गुजरातची घरच्या मैदानावर विजयी सुरवात

प्रो कबड्डीमध्ये कालपासून अहमदाबाद येथे सामने सुरु झाले. अहमदाबाद हे घरचे मैदान असलेले गुजरात फॉरचूनजायन्टस आणि यु.मुंबा एकमेकांसमोर उभे होते. या सामन्यात गुजरात संघाने यु.मुंबाचा ३९-२१ असा पराभव केला. या विजयात गुजरातकडून रोहीत गुलिया, सचीन आणि अबोझार मिघानी यांनी चांगली कामगिरी केली तर यु.मुंबाकडून कोणत्याही खेळाडूला छाप पडता आली नाही.

पहिल्या सत्रापासून सामन्यात गुजरातची पकड होती. गुजरातने ७ व्या मिनिटाला यु.मुंबाला ऑल आऊट करत सामन्यात ९-१ अशी मजबूत आघाडी घेतली. या सामन्यात रोहीत गुलिया याला संधी देण्यात आली. त्याने गुजरातसाठी रेडींगमध्ये उत्तम कामगिरी करत गुण मिळवले. याच कारणामुळे यु.मुंबा पहिल्या सत्रात दोन मिनिटे बाकी आसताना पुन्हा ऑल आऊट झाली. या ऑल आऊट नंतर २०-६ अशी आघाडी गुजरातने सामन्यावर पकड मिळवली. पहिले सत्र याच गुणसंख्येवर संपले.

दुसरे सत्र सुरु झाले आणि यु.मुंबा चांगली कामगिरी करत या सामन्यात परतेल असे दिसत होते. यु.मुंबाने दुसऱ्या सत्रात १० मिनिटे झाली असता सामना २६-१३ अश्या गुणसंख्येवर आणला. त्यानंतर यु.मुंबाला गुण मिळवता आले नाहीत. त्यांचे रेडर रेडींगमध्ये गुण मिळवू शकले नाहीत तर डिफेन्समधील खेळाडू विरोधी संघाला गुण बहाल करत होते. सामना संपायला ३ मिनिटे शिल्लक असताना यु.मुंबा पुन्हा ऑल आऊट झाली. गुजरातची आघाडी ३७-२१ अशी झाली. हा सामना गुजरातने ३९-२१ अश्या मोठ्या फरकाने जिंकला.

या सामन्यात यु.मुंबाचे रेडर आणि डिफेंडर सपशेल अपयशी ठरले. गुजरातने हा सामना जिंकून घरच्या मैदानावरील सामन्यात विजयी सुरुवात केली.