गुजरात मारू शकेल का विजयी मुसंडी ?

प्रो कबड्डीच्या ५ मोसामाची सुरुवात एकदम धडाक्यात झाली आहे. या मोसमाचा पहिला आठवडा संपला आणि या आठवडयातील सामन्याची सुरुवात आज दबंग दिल्ली आणि गुजरात फॉरचुनजायंट्स या सामन्याने होणार आहे. दबंग दिल्लीने या मोसमातील आपला पहिला सामना जिंकला असून ते आज दुसरा सामना खेळतील.

गुजरातचा संघ या मोसमामध्ये नव्याने सामील केलेल्या संघापैकी एक आहे आणि ते आज आपला पहिला सामना खेळतील. या संघाचा कर्णधार असणार आहे मागील चारही मोसम तेलगू टायटन्स संघासाठी खेळलेला सुकेश हेगडे. गुजरातचा संघ डिफेन्समध्ये मजबूत वाटतो आहे कारण त्यांच्याकाडे फझल अत्राचली सारखा मजबूत डिफेंडर आहे. फझल मागील मोसमामध्ये बेस्ट डिफेंडर होता आणि त्याच्या टॅकलमधील यशाची सरासरी तब्बल ६२% पेक्षा जास्त होती. फझलने मागील मोसमामध्ये टॅकलमधे ५२ गुण मिळवले होते. फझल सोबत या संघामध्ये इराणचाच डिफेंडर अबोझर मिघानी देखील आहे. याला संघात स्थान मिळेल की नाही या बाबत थोडी शंका आहे जर त्याला संघात स्थान मिळाले नाही तर विकास काळेला डिफेन्समध्ये खेळवले जाऊ शकते.

गुजरातचा संघ रेडींग डिपार्टमेंटमध्ये ही समतोल संघ वाटतो आहे. संघाकडे सुकेश हेगडे हा प्रो कबडीमधील एक यशस्वी रेडर आहे तर त्याला साथ देण्यासाठी महेंद्र राजपूत आहे जो अगोदर बेंगाल वॉरीयर्स संघाकडून खेळायचा. गुजरातकडे पवन शेरावत आहे ज्याने मागील मोसमात बेंगळुरू बुल्स संघासाठी चांगली कामगिरी केली होती. गुजरातकडे महिपाल नरवाल हा ऑलराऊंडर खेळाडू आहे ज्याला संघात स्थान मिळाले तर तो उत्तम कामगिरी करू शकतो.

दबंग दिल्लीची ताकद हा त्यांचा डिफेन्स असून मागील सामन्यात जयपूर सारख्या तगड्या संघाला त्यांनी हरवले आहे. दबंग दिल्लीचा रेडर रवी दलाल याला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. निलेश शिंदेने मागील सामन्यात डिफेन्समध्ये ५ गुण मिळवले होते आणि विजयाचे मुख्य कारण बनला होता. आज परत दबंग दिल्ली संघाच्या डिफेन्सला जबाबदारीने खेळ करावा लागेल तेव्हाच ते सामना जिंकू शकतील. दबंग दिल्लीसाठी मिराजने शेखने रेडींगमध्ये ७ गुण मिळवले होते आणि डिफेन्सिव्ह झालेल्या सामन्यात ही मोठी कामगिरी त्याने केली होती. त्याला इराणच्याच अबोफझलने उत्तम साथ देत ४ रेडींग गुण मिळवले होते.

याच सामन्यातील विशेष बाब म्हणजे या सामन्याला इराणियन तडका लागणार आहे. कारण या दोन्ही संघाकडे एकूण ४ उत्तम इराणियन खेळाडू आहेत जे आपले कौशल्य आज दाखवतील. त्याच बरोबर गुजरातचा संघ आपला पहिला सामना जिंकून त्यांची प्रो कबाडीची सुरुवात विजयाने करण्यास उत्सुक असेल.