गुजरात फॉरचूनजायन्टसने पदार्पणाच्या मोसमातच गाठली अंतिमफेरी

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात काल दोन्ही झोनमधील पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या संघात सामना झाला. ‘झोन ए ‘मध्ये गुजरात फॉरचूनजायन्टस पहिल्या स्थानावर होते तर ‘झोन बी’ मध्ये बेंगाल वॉरियर्स पहिल्या स्थानावर होते. या दोन संघात सामना जो जिंकेल तो थेट अंतिम फेरीत पोहचणार होता. त्यामुळे या सामन्याला वेगळेच महत्व होते. या सामन्यात गुजरात संघाने बेंगाल संघाचा ४२-१७ असा पराभव करत अंतिमफेरी गाठली.

हा सामना जिंकत गुजरात फॉरचूनजायन्टस हा पहिला संघ बनला ज्याने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. २६ ऑक्टोबर रोजी पटणा पायरेट्स आणि बेंगाल यांच्यात होणाऱ्या सामन्यात जो संघ विजेता ठरेल. तो संघ अंतिम फेरीत पोहचणार दुसरा संघ बनेल. अंतिम सामना २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

गुजरातचा संघ या मोसमात प्रो कबडीमध्ये नव्याने सामील केलेल्या ४ संघापैकी एक आहे. या संघातील कर्णधार सुकेश हेगडे आणि फझल अत्राचली हे दोनच नावे भारतीय कबड्डीप्रेमींना पाचवा मोसम सुरु होण्याच्या अगोदर माहिती होते. त्यात हा संघ ‘झोन ए’ मध्ये होता. या झोनमध्ये यु मुंबा, जयपूर पिंक पँथर या सारखे माजी विजेते संघ आणि पुणेरी पलटण सारखा स्टार खेळाडूंनी भरलेला संघ असल्याने गुजरात संघाला कमकुवत समजले जात होते.

गुजरातचा संघ प्ले ऑफमध्ये देखील स्थान मिळवू शकणार नाही अशी भाकिते क्रीडाप्रेमी करत होते. परंतु प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाली आणि गुजरातने कमालीचा खेळ करत झोन ए मध्ये पहिले स्थान पटकावले. त्यानंतर प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले. त्यानंतर त्यांनी बेंगाल वॉरियर्स संघाला हरवत अंतिम फेरीत स्थान मिळवले.

पदार्पणाच्या मोसमात अंतिम फेरी गाठत गुजरात फॉरचूनजायन्टस संघाने प्रो कबड्डीच्या इतिहासात आपले नाव कोरले.