प्रो कबड्डी: गुजरात करणार का एकमेव पराभवाची परतफेड?

कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस इंडोर स्टेडियममध्ये आज पहिला सामना गुजरात फॉरचून जायन्टस आणि हरयाणा स्टीलर्स यांच्या होणार आहे. या मोसमात अगोदर दोन वेळेस हे संघ आपसात भिडले होते. पहिला सामना बरोबरीत सुटला होता. दुसऱ्या सामन्यात हरयाणाने बाजी मारली होती.

गुजरातचा संघाने त्याचा खेळ खूप उंचावला आहे. घरेलू मैदानावर या संघाने जी विजयाची लय पकडली होती ती कायम आहे. मागील काही सामन्याचा विचार केला तर हा संघ सर्वात मजबूत संघ वाटतो. या संघाची ताकद यांचे डिफेंडर असली तरी रेडींगमध्ये या संघातील नवखा सचिन आणि रोहित गुलियानी कमालीचे सातत्य दाखवले आहे. कर्णधार सुकेश हेगडेला अजून लय गवसली नाही.

या संघाचा मुंबई मधील सामना पावसामुळे रद्द झाला होता. २२ ऑगस्टच्या सामन्यातील विजयानंतर हा संघ मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या संघाला भरपूर विश्रांती मिळाली आहे. गुजरातच्या मागील सामन्यात फझल अत्राचलीने डिफेन्समध्ये ९ गुण मिळवले होते त्यामुळे सर्वांच्या नजारा आज पुन्हा त्याच्या कामगिरीकडे असतील.

हरयाणा स्टीलर्सचा संघ डिफेन्समध्ये उत्तम कामगिरी करत आहे. परंतु या संघाची डोकेदुखी त्यांचे रेडर आहेत. यु मुंबा विरुद्धच्या मागील सामन्यात या संघाच्या रेडर्सने उत्तम कामगिरी केली होती पण बलस्थान असलेला डिफेन्सने या सामन्यात निराशा केली होती. मागील दोन सामन्यात कर्णधार सुरिंदर नाडा जास्त प्रभावी कामगिरी करू शकला नाही.मोहित चिल्लर याने मागील सामन्यात तीन गुण मिळवले असले तरी तो प्रभावी दिसला नव्हता.

दोन्ही संघ डिफेन्समध्ये मजबूत आहेत. त्यामुळे या सामन्यात प्रत्येक गुणांसाठी चुरस दिसण्याची शक्यता आहे. या सामन्यात विजयाची जास्त संधी गुजरात संघाला आहे. हरयाणा स्टीलर्स संघाच्या रेडर्सने उत्तम कामगिरी केली तर हा सामना ते खिशात घालू शकतील. गुजरातची मागील काही सामन्यातील कामगिरी पाहता हे तेवढे सोपे काम नाही आहे. गुजरात संघाला पराभूत करणारा एकमेव संघ असणारा हरयाणा पुन्हा तो कमाल करू शकतो का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.