आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरीत इंडोनेशियाच्या बिट्राईस गुमूल्या व मॉंटेनिग्रोच्या एना वेस्लीनोविक यांना विजेतेपद 

पुणे: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 18व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीत चीनच्या जिया-जिंग लू, रशियाच्या व्हॅलेरिया सवयिंख या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीत इंडोनेशियाच्या बिट्राईस गुमूल्या व मॉंटेनिग्रोच्या एना वेस्लीनोविक या जोडीने विजेतेपद पटकावले.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत चीनच्या अव्वल मानांकित जिया-जिंग लू हिने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत काल मानांकित खेळाडूंवर विजय मिळविणाऱ्या जॉर्जियाच्या मरियम बोलकवडझचा 6-3,6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना 1तास 14 मिनिटे चालला.  रशियाच्या व्हॅलेरिया सवयिंखने पोलंडच्या तिसऱ्या मानांकित कॅटरझायना कावाचा टायब्रेकमध्ये 6-3,2-6,7-6(8-6)असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 2 तास 19मिनिटे चालला. अंतिम फेरीत व्हॅलेरिया सवयिंखपुढे अव्वल मानांकित जिया-जिंग लूचे आव्हान असणार आहे.

दुहेरीत चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत इंडोनेशियाच्या बिट्राईस गुमूल्या व मॉंटेनिग्रोच्या एना वेस्लीनोविक यांनी कॅनडाच्या शेरॉन फिचमन व रशियाच्या व्हॅलेरिया  सवयिंख यांचा सुपरटायब्रेकमध्ये 7-6(4), 1-6, 11-9असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. स्पर्धेतील विजेत्या जोडीला 50डब्लूटीए गुण व 1450डॉलर अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरणडेक्कन जिमखानाच्या  नियामक मंडळाचे सदस्य प्रमोद बाकरे आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक व टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे आणि आयटीएफ गोल्ड बॅच रेफ्री शितल अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या एकेरी गटाच्या अंतिम फेरीचा सामना आज(दि.15 डिसेंबर रोजी)सकाळी 10वाजता होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एनइसीसी महाव्यवस्थापक बीएसआर शास्त्री, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि डेक्कन जिमखाना क्लबचे मानद सचिव व एमएसएलटीएचे उपाध्यक्ष विश्वास लोकरे, स्पर्धेचे संचालक व टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे यांच्या हस्ते होणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:उपांत्य फेरी: एकेरी गट:

जिया-जिंग लू(चीन)(1)वि.वि.मरियम बोलकवडझ(जॉर्जिया)6-3,6-2;

व्हॅलेरिया सवयिंख(रशिया)वि.वि.कॅटरझायना कावा(पोलंड)(3)6-3,2-6,7-6(8-6);

दुहेरी गट: अंतिम फेरी:

बिट्राईस गुमूल्या(इंडोनेशिया)/एना वेस्लीनोविक(मॉंटेनिग्रो)वि.वि.शेरॉन फिचमन(कॅनडा)/व्हॅलेरिया  सवयिंख(रशिया)(4)7-6(4), 1-6, 11-9.