टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या पहिल्या फेरीत प्रजनेश गुन्नेश्वरण समोर मायकेल मोहचे आव्हान

दुहेरीत रोहन बोपन्ना-दिवीज शरण यांचा राडू अल्बोट-मालेज झाजेरी यांच्याशी लढत

पुणे | एटीपी 250 वर्ल्ड टूर टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचा मुख्य फेरीचा ड्रॉ समारंभ थाटात पार पडला. मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत भारताचा अव्वल मानांकित खेळाडू प्रजनेश गुन्नेश्वरणचा सामना अमेरिकेच्या मायकेल मोह याच्याशी होणार आहे.

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचा मुख्य फेरीचा ड्रॉ पीएमसीचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते काढण्यात आला. यावेळी स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर, एटीपी सुपरवायझर मिरो ब्रातोव, एटीपी टूरचे व्यवस्थापक अर्नाउ बृजेस, भारताचा प्रजनेश गुन्नेश्वरन, गतविजेता सिमॉन जाईल्स आदी मान्यवर उपस्थित होते.

जागतिक क्र.103असलेल्या प्रजनेश गुन्नेश्वरण आणि मायकेल मोह हे दोघेही (अलेक्झांडर वास्के टेनिस युनिव्हर्सिटी) या एकाच अकादमीत सराव करत आहेत.यावेळी प्रजनेश म्हणाला कि, मायकेल मोह आणि मी एकाच अकादमीत सराव करत असून आम्ही दोघांनी याआधीचा मौसम देखील एकत्र खेळला आहे. पण त्याच्याविरुद्ध मी उत्तम खेळ करेन आणि पहिल्या फेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आणेन.

गतवर्षीच्या स्पर्धेत मला चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यावेळी भारतात मी पहिल्यांदाच खेळत असल्यामुळे माझ्यासाठी तो अनुभव अविस्मरणीय होता, असे गतविजेता सिमॉन जाईल्स याने सांगितले.

स्पर्धेत पहिल्या फेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या पुण्याच्या अर्जुन कढे याचा सामना लासलो जेरे याच्याशी, तर भारताच्या रामकुमार रामनाथन पुढे जागतिक क्र.97असलेल्या मार्सेल ग्रनॉलर्सचे आव्हान असणार आहे. मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत केविन अँडरसन, हियोन चूँग, सिमॉन जाईल्स, मालेक झाजेरी या चार मानांकित खेळाडूंना पुढे चाल मिळाली आहे.

दुहेरीत रोहन बोपन्ना-दिवीज शरण यांचा राडू अल्बोट-मालेज झाजेरी यांच्याशी, तर लिएंडर पेस व एम रियास वरेला यांचा सामना डी मरेरो व एच पॉडलीपिंक कॅस्टीलो या जोडीशी होणार आहे