“झाले बहू,होतील बहू पण या सम हीच: अभिलाषा म्हात्रे!

२७ नोव्हेंबर रोजी अभिलाषा म्हात्रे यांचा जन्मदिवस होता!अभिलाषा म्हात्रे हे नाव कबड्डी विश्वातील अतिशय प्रख्यात असे नाव आहे! महाराष्ट्रात तर हे नाव कबड्डी रसिकांच्या हृयात आहे! अर्जुन पुरस्काराला गवसणी घालणाऱ्या अभिलाषा या खऱ्या अर्थाने भारतीय कबड्डी इतिहासातील एक महान खेळाडू आहेत !नुकत्याच झालेल्या आशियाई विजेतेपद स्पर्धेत त्यांनी भारताचे कर्णधारपद भूषवले! भारतीय संघाने या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखत जेतेपद पटकावले!!

कबड्डी हा एक अतिशय राकट आणि ताकदीचा असा खेळ समजला जातो त्यामुळे हा खेळ बघण्यासाठी सुंदर,सुखावणारा असेल असा कोणी विचारही केला नसेल! मात्र अभिलाषा यांचा खेळ बघितला की आपल्याला जाणवतं की हा खेळ बघण्यासाठीही किती सुंदर आणि नेत्रदीपक असू शकतो! त्यांचं पदलालीत्य अफलातून आहे! त्यांच्यासारखा सुंदर आणि सर्वांगाने परिपूर्ण ‘टो-टच’ संपूर्ण कबड्डी विश्वात कोणीही करू शकत नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो! मला असं नेहमी वाटते की सचिन चा ‘स्ट्रेट ड्राईव्ह’ बघताना जेवढा आनंद मिळतो ना तेव्हढाच अभिलाषा यांचा ‘टो-टच’ बघताना मिळतो!

कबड्डी क्षेत्रात एखादा खेळाडू जितकेही यशाची शिखरे पादाक्रांत करू शकतो ती सर्व त्यांनी पादाक्रांत केलेली आहेत! दक्षिण आशियाई स्पर्धा,आशियाई स्पर्धा यांमध्ये सुवर्णपदक, महाराष्ट्राचे कर्णधारपद, अर्जुन पुरस्कार आणि आता भारताचे कर्णधारपद! अशी विलक्षण यशस्वी कारकीर्द त्यांच्या महान खेळाडू असण्याची साक्ष देतात!

एवढ्या मोठ्या खेळाडू असून देखील त्यांचे पाय जमिनीवरच आहेत ही त्यांची विशेषता! नम्रपणा त्यांच्या ठायी वसतो!विरोधी संघातील खेळाडूंचा त्या नेहमीच आदर करत आपल्या खेळाडूवृत्तीचं प्रदर्शन करतात!

त्यांच्या ठायी असलेल्या या सर्व गुणांमुळे त्या खरोखर सर्व खेळाडूंसाठी आदर्श ठरतात!

आपण ज्या ही संघाकडून खेळू त्या संघाला विजय मिळवून द्यायचा या एकाच निर्धाराने त्या मैदानात उतरतात!त्यामुळे येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राला विजय मिळवून देण्यासाठी त्या सर्वस्व पणाला लावतील यात काही शंका नाही!

महाराष्ट्राला विजय मिळवून देण्याची त्यांची ही ‘अभिलाषा’ पूर्ण होवो हीच आमची ‘अभिलाषा’!
ता.क.:वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

-शारंग ढोमसे